मनपाला कोरोनाचा विळखा : १५ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 21:28 IST2020-08-26T21:27:17+5:302020-08-26T21:28:26+5:30
महापालिका आयुक्त कोरोनाबाधित आढळल्यानंतर आता त्यांच्या टीममधील अनेकजण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे ज्या महापालिकेच्या नेतृत्वात नागपूरकर कोरोनाशी लढा देत होते. त्याच महापालिकेभोवती कोरोनाने विळखा घातला आहे.

मनपाला कोरोनाचा विळखा : १५ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त कोरोनाबाधित आढळल्यानंतर आता त्यांच्या टीममधील अनेकजण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे ज्या महापालिकेच्या नेतृत्वात नागपूरकर कोरोनाशी लढा देत होते. त्याच महापालिकेभोवती कोरोनाने विळखा घातला आहे. बुधवारी आलेल्या चाचणी अहवालामध्ये महापालिकेतील आणखी १५ अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे हे कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी समोर आले होते. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर महापालिकेतील सुमारे ९० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे चाचणी अहवाल समोर आले असून मुख्यालयात काम करणारे १५ अधिकारी आणि कर्मचारी बाधित आढळले आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी आणि क्रीडा विभागातील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यापूर्वी अग्निशमन दलातील १४ जण कोरोना बाधित आढळले होते. त्या शिवाय महापालिकेच्या गांधीनगर आणि लकडगंज झोन मधील काही अधिकारी व कर्मचारीही कोरोना बाधित झाले होते. मात्र, त्यांचे सर्वाचे कार्यालय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाहेर होते. आता मात्र कोरोनाचा शिरकाव मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झाला आहे. आधी मनपा प्रशासनाचे नेतृत्व करणारे आयुक्त आणि त्यानंतर आरोग्य आणि क्रीडा विभागातील १५ अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोनाबाधित आढळल्याने महापालिकेसह नागपूरकरांची चिंता वाढली आहे.