NMC: 1,138 tempraray cleaners will be permanent | मनपा : १,१३८ ऐवजदार सफाई कर्मचारी होणार स्थायी

मनपा : १,१३८ ऐवजदार सफाई कर्मचारी होणार स्थायी

ठळक मुद्दे१० कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेशाचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सफाई कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. याची दखल घेत २ मार्च २०२० रोजी मनपाच्या स्थापना दिनी मनपातील ४,३४७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांपैकी २,२०६ ऐवजदारांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १,१३८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित समारंभात महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहा झोनमधील ११ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी गजेंद्र महल्ले, राजेश हाथीबेड, किशोर मोटघरे, राजेश लवारे यांच्यासह दहाही झोनचे विभागीय अधिकारी तसेच स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते.

ऐवजदार सफाई कर्मचारी बांधवांकडून केल्या जाणाऱ्या सेवेचा सन्मान करणे हा मनपातील गौरवाचा क्षण आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेला विषय मार्गी लावून ऐवजदारांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकण्यात आपले योगदान असल्याचे समाधान असल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले.

Web Title: NMC: 1,138 tempraray cleaners will be permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.