Nitinji, take care of your health! Gadkari inquired by Rajnath Singh | नितीनजी, सेहत का ख्याल रखिए ! राजनाथसिंह यांनी केली गडकरींची चौकशी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापूरहून विमानाने नागपूरला आल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

ठळक मुद्देनागपूर विमानतळावर झाली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी भोवळ आल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी सायंकाळी नागपुरात परतले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तुमच्या कामाचा धडाका संपूर्ण देश पाहत आहे. मात्र तुम्ही आपल्या तब्येतीचीदेखील काळजी घेत जा, असा आपुलकीचा सल्ला यावेळी राजनाथसिंह यांनी गडकरी यांना दिला. दरम्यान, गडकरी सुखरुप असल्याचे पाहून त्यांच्या हितचिंतकांचा जीव भांड्यात पडला.
सोलापूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती कळली अन् कार्यकर्त्यांच्या छातीतच धस्स झाले. ‘आॅल इज वेल’ असल्याचे वृत्त येत असले तरी मनात काळजी कायम होती. आपल्या नेत्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडणारच नव्हते. गुरुकुंज मोझरी येथे भाजपाच्या महाजनादेश यात्रेसाठी आलेल्या राजनाथसिंह यांनादेखील ही माहिती मिळाली होती. मोझरीहून नागपूर विमानतळावर आल्यानंतर राजनाथसिंग यांना काही वेळातच नितीन गडकरी हे सोलापूरहून येणार असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी काही वेळ प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. नितीन गडकरी विमानातून उतरल्यावर विमानतळावरच दोघांची भेट झाली. यावेळी राजनाथसिंह यांनी गडकरी यांची आस्थेने चौकशी केली.

माझी प्रकृती स्थिर : गडकरी
कार्यक्रमादरम्यान भोवळ आल्यानंतर गडकरी यांची सोलापूर येथेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व तपासण्या ‘नॉर्मल’ आढळून आल्या. नागपूर विमानतळावर आल्यानंतर गडकरींनी माझी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले व त्यांच्या हितचिंतकांमधील तणाव दूर झाला.

Web Title: Nitinji, take care of your health! Gadkari inquired by Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.