मंत्री आशीष शेलार यांच्या विरोधात नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार; मुस्लीम मतदारांविषयी केलेल्या विधानावरून कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 22:40 IST2025-11-05T22:38:29+5:302025-11-05T22:40:08+5:30
पोलिसांना पेनड्राईव्ह मध्ये पुरावा दिला

मंत्री आशीष शेलार यांच्या विरोधात नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार; मुस्लीम मतदारांविषयी केलेल्या विधानावरून कारवाईची मागणी
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व मंत्री आशिष शेलार यांच्या सांप्रदायिक वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, आमदार डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर येथील जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेलार यांनी रविवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर नागपूरमधील मुस्लीम मतदारांविषयी केलेल्या विधानावरून डॉ. राऊत आज जास्तच आक्रमक दिसून आलेत.
डॉ. राऊत यांनी सादर केलेल्या तक्रारीत शेलार यांनी पत्रकार परिषदेत मुस्लिम मतदारांना धमकावण्याचा आणि मुस्लिम, हिंदूंमध्ये द्वेष आणि शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. जे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. यावेळी डॉ. राऊत यांनी मंत्री शेलार यांच्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह देखील पोलिसांना पळताळणी करिता दिला आहे. ज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीय आधारावर द्वेष आणि फूट पाडण्यासाठी मुद्दाम मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला.
संपूर्ण पत्रकार परिषदेत मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या, स्वार्थासाठी मुस्लिम आणि इतर समुदायांमध्ये असंतोष, द्वेष आणि तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपकरित डॉ. राऊत यांनी शेलार यांच्याविरोधात लवकरात लवकर कठोर कारवाईची मागणी केली.
राज्य निवडणूक आयोगातही तक्रार
लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ च्या कलम १२३(३) नुसार धर्म, जात, समुदाय किंवा भाषा यांच्या आधारावर मत मागणे वा मतदारांमध्ये धार्मिक विद्वेष पसरवणे हे निवडणूक गुन्हा मानला जातो. त्यामुळे शेलार यांचे वक्तव्य हे निवडणूक आचारसंहितेचे आणि कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचे भाजप नेते आशीष शेलार यांच्या सांप्रदायिक वक्तव्यावरून काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.