नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास  

By कमलेश वानखेडे | Published: March 14, 2024 07:18 PM2024-03-14T19:18:17+5:302024-03-14T19:19:52+5:30

सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही.

Nitin Gadkari believes that Nagpur will become the logistics capital of the country | नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास  

नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास  

नागपूर: सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही. त्यामुळे नागपूरमधील उद्योगांना सिंदी ड्राय पोर्टशी जोडून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात नागपूर हे देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ म्हणून नावारुपाला आलेले असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सिंदी रेल्वे येथे बहुप्रतीक्षित अशा मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कचे नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी सिंदी रेल्वे टर्मिनल सेवेच्या चाचणीलाही त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे (जेएनपीटी) अध्यक्ष उन्मेष वाघ, एनएचएलएमएलचे संचालक के. सत्यनाथन आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, ‘आज विदर्भाच्या शेतातील उत्पादन किंवा याठिकाणी तयार होणाऱ्या वस्तुंची बांगलादेशमध्ये निर्यात करायची असेल तर रेल्वेने मुंबईला पाठवून तेथून समुद्रामार्गे श्रीलंका व श्रीलंकेतून बांगलादेशला पाठवावे लागते. आता या लॉजिस्टिक पार्कमधून रेल्वेमार्गे थेट हल्दिया (प.बंगाल) आणि तेथून बांगलादेशला आपला माल निर्यात करता येणार आहे. नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग देखील येथून जवळ आहे. ड्राय पोर्टमुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.

नागपूर-वर्धा अवघ्या ३५ मिनिटांत
नागपूर ते वर्धा या रेल्वे मार्गावर चौथ्या लाईनचे काम सुरू झाल्यामुळे तसेच नागपूर ते वर्धा ब्रॉडगेज मेट्रोचा करार झाल्यामुळे नागपूर-वर्धा अंतर केवळ ३५ मिनिटांत कापणे शक्य होईल, असे ना. श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी सिंदी ते सेलडोह या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण आणि चौपदरीकरणासाठी १०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलू असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, असेही गडकरी म्हणाले.

Web Title: Nitin Gadkari believes that Nagpur will become the logistics capital of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.