डल्लू सरदारसह नऊ जणांना जन्मठेप

By Admin | Updated: September 29, 2016 02:08 IST2016-09-29T02:08:57+5:302016-09-29T02:08:57+5:30

कोट्यवधीच्या मालमत्तेवरील कब्ज्यातून उत्तर नागपुरातील प्रॉपर्टी डीलर सूरज यादव याचा निर्घृण खून करून कुटुंबातील अन्य दोघांवर प्राणघातक हल्ला

Nine people, including Dalu Sardar, have life imprisonment | डल्लू सरदारसह नऊ जणांना जन्मठेप

डल्लू सरदारसह नऊ जणांना जन्मठेप

मकोका न्यायालयाचा निकाल बहुचर्चित सूरज यादव खून खटला सात आरोपी निर्दोष
नागपूर : कोट्यवधीच्या मालमत्तेवरील कब्ज्यातून उत्तर नागपुरातील प्रॉपर्टी डीलर सूरज यादव याचा निर्घृण खून करून कुटुंबातील अन्य दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी डल्लू सरदार याच्यासह नऊ जणांना बुधवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मकोका) विशेष न्यायाधीश अशोक धामेच्या यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याच प्रकरणातील सात आरोपींची सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका करण्यात आली.

शिक्षा झालेले आरोपी
डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग नानकसिंग दिगवा (३४) रा. वैशालीनगर, गोल्डी सरदार ऊर्फ कुलजितसिंग गोपालसिंग मुलतानी रा. बाबा बुधाजीनगर, मनमितसिंग ऊर्फ सन्नी ऊर्फ गुटाई सुरेंद्रसिंग दिगवा, छोटू ऊर्फ संदीपसिंग बलविंदरसिंग जोहर, बबलू ऊर्फ मोहरोज सरदार हुसैन जईदी रा. ताजनगर टेका, रवींद्रसिंग ऊर्फ बंटी ऊर्फ लंगड्या राजेंद्रसिंग आनंद रा. बुद्धनगर, पप्पू गजानन झाडे रा. सोनार टोली यशोदरानगर, विनोद रामराव पंचाग रा. यशोदरानगर, आकाश पुरुषोत्तम माहुरकर रा. सुजातानगर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अशी आहे शिक्षा
आरोपींना जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा भादंविच्या ३०२, १४९ कलमांतर्गत सुनावण्यात आली. भादंविच्या ३२४, १४९ कलमांतर्गत सहा महिने सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. भादंविच्या १४३ कलमांतर्गत एक महिना सश्रम कारावास आणि २०० रुपये दंड, १४४ कलमांतर्गत तीन महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, १४७ कलमांतर्गत तीन महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, १४८ कलमांतर्गत सहा महिने सश्रम कारावास एक हजार रुपये दंड आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
प्रॉपर्टी हडपण्यातून घडला होता थरार
डल्लू सरदार याने आपल्या साथीदारांसह १८ नोव्हेंबर २०१२ रोजी लष्करीबाग येथील रहिवासी प्रॉपर्टी डिलर सूरज अशोक यादव (२८) याचा दिवसाढवळ्या दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सशस्त्र हल्ला करून खून केला होता. सूरजची गरोदर पत्नी मनदीपकौर आणि भाऊ राजेश यादव यांच्यावरही हल्ला करून जखमी केले होते.
सूरज यादव हा चुनाभट्टी येथील भाजपचे नगरसेवक मुन्ना यादव यांचा साळा होता. मुन्ना यादव यांच्या मालकीचा झिंगाबाई टाकळी येथे १४००० चौरस फुटाचा भूखंड आहे. या भूखंडाची देखरेख सूरज करायचा. या भूखंडावर अवैध कब्जा करण्यातून हा खुनी थरार घडला होता.

Web Title: Nine people, including Dalu Sardar, have life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.