नागपूर जिल्ह्यातील धापेवाड्याच्या विहिरीत पडली नीलगाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 00:18 IST2020-03-14T00:17:39+5:302020-03-14T00:18:17+5:30
कळमेश्वरच्या धापेवाडा खुर्द परिसरातील एका विहिरीत पडलेल्या नीलगायीची वन विभागाने सुटका करून तिला सुखरुप बाहेर काढले आहे.

नागपूर जिल्ह्यातील धापेवाड्याच्या विहिरीत पडली नीलगाय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमेश्वरच्या धापेवाडा खुर्द परिसरातील एका विहिरीत पडलेल्या नीलगायीची वन विभागाने सुटका करून तिला सुखरुप बाहेर काढले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता घडली.
वन विभागाच्या हॅलो फॉरेस्ट हेल्पलाईन क्रमांक १९२६ वर स्थानिक नागरिकांनी विहिरीत नीलगाय पडल्याची माहिती वन विभागाला दिली. राजेश तिडके यांच्या शेतातील विहिरीत पाणी आहे. सकाळी याच विहिरीत नीलगाय पडलेली दिसली. त्यानंतर सेमिनरी हिल्स रेस्क्यु टीमचे वन परिक्षेत्र अधिकारी जी. एन. जाधव, वनपाल कैलाश जामगडे, आर. बी. तिबोले, ए. एन. मुसळे, व्ही. एस. बावधने, डी. एस. खरबडे, रवींद्र मिटकरी यांची चमू घटनास्थळी पोहोचली. चमूने दोर बांधून जाळी विहिरीत टाकली. ही जाळी नीलगायीच्या जवळ नेऊन नीलगाय जाळीत बसली. त्यानंतर जाळीला वर ओढून नीलगायीला सुखरुप बाहेर काढण्यात आले. नीलगायीच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतर तिला वन क्षेत्रात सोडण्यात आले.