समृद्धी महामार्गावरील रात्रीचे अपघात ‘लुम अलर्ट’मुळे थांबणार !

By आनंद डेकाटे | Updated: July 26, 2025 18:50 IST2025-07-26T18:49:27+5:302025-07-26T18:50:28+5:30

रात्र प्रवासातील संमोहन टाळणारे संशोधन : डॉ. संजय ढोबळे यांना आंतरराष्ट्रीय पेटंट

Night accidents on Samruddhi Highway will stop with 'Lum Alert'! | समृद्धी महामार्गावरील रात्रीचे अपघात ‘लुम अलर्ट’मुळे थांबणार !

Night accidents on Samruddhi Highway will stop with 'Lum Alert'!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
समृद्धी महामार्ग हा विदर्भासाठी विकासाचा रस्ता ठरला असला, तरी रात्रीच्या वेळी येथे होणाऱ्या अपघातांची मालिका काही थांबलेली नाही. अंधार, संमोहन आणि थकवा ही अपघातांची मुख्य कारणं आहेत. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने यावर दिलेला उपाय ‘लुम अलर्ट’ आता गेमचेंजर ठरणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांनी त्यांच्या विद्यार्थिनी खुशबू सिंग आणि नमीका शेख यांच्या सहकार्याने ‘लुम अलर्ट’ या नावाने एक प्रकाशमय मॉडेल तयार केले. या योजनेला आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळाले आहे.

‘लुम अलर्ट’ म्हणजे काय?
- प्रत्येक ५० किमीवर एक ‘प्रकाश द्वार’ (एलईडी गेटवे)
- गेटच्या आधी १० मीटरच्या अंतरावर लाल, निळे, हिरवे एलईडी झाडे
- गेटवर एलईडीचा मोर व दिव्यांचा गुच्छ
- चालकाला लांबूनच प्रकाशमय दृश्य दिसते आणि संमोहन तुटतो
- रात्र प्रवासात झोप येण्याची शक्यता कमी होते
- २ ते ५ किमी अंतर प्रकाशमय वातावरणात वाहन प्रवास करतो

अपघातमुक्त रात्र प्रवासाची नवी दिशा
डॉ. ढोबळे यांच्या मतानुसार, हे ‘लुम अलर्ट गेटवे’ दर १०० किमी अंतरावर बसवले, तर वाहनचालकांचे लक्ष जागृत राहील आणि अपघात टाळता येतील. एका अपघातानंतर ही संकल्पना सुचली, ज्यामध्ये उमरेडजवळ रात्री झोप लागून वाहनचालकामुळे चार जणांचा मृत्यू झाला होता.

विद्यापीठाचे अभिनंदन
या उपयुक्त संशोधनासाठी डॉ. संजय ढोबळे, खुशबू सिंग आणि नमीका शेख यांचे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त अधिकारी हरीश पालीवाल, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांनी अभिनंदन केले.

Web Title: Night accidents on Samruddhi Highway will stop with 'Lum Alert'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.