‘सुपरमून’ आणि ‘उल्कावर्षाव’ने होईल नववर्षाचे स्वागत ! पहिल्याच आठवड्यात आकाशप्रेमींसाठी पर्वणी
By निशांत वानखेडे | Updated: December 29, 2025 19:53 IST2025-12-29T19:51:47+5:302025-12-29T19:53:31+5:30
२०२६ ची आकाश नवलाई अनुभवा : गुरू, शुक्राचे तेजस्वी दर्शन

New Year will be welcomed with a 'supermoon' and a 'meteor shower'! A treat for sky lovers in the first week
नागपूर : अवकाशात घडणाऱ्या नयमरम्य घटनांचे दर्शन येत्या नववर्षातही घेता येणार आहे. विशेष म्हणजे नववर्षारंभीच हा नजारा बघायला मिळणार आहे. येत्या ३ जानेवारीला चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या जवळ येत आहेत. त्यामुळे चंद्र अधिक प्रकाशित असेल, म्हणजे सुपरमून असेल. ३ व ४ जानेवारीला उल्कावर्षावही अनुभवता येणार आहे.
ग्रह-ताऱ्यांच्या मैत्री व परस्पर संबंधातून घडणाऱ्या विविध प्रकारच्या खगोलीय घटनांचा आनंद घेत यंदा आकाशप्रेमींनी नववर्षाचे स्वागत करा, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे. ३ जानेवारीला चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या जवळ आल्याने चंद्र अधिक प्रकाशित असल्याने सुपरमून असेल. असाच नजारा २४ नोव्हेंबर व २४ डिसेंबर रोजी बघता येईल. यावेळी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर अतिशय कमी असेल. तसेच सूर्य सुध्दा येत्या ३ जानेवारीला पृथ्वी जवळ येईल, परंतु सध्या सूर्य दक्षिण गोलार्धात झुकलेला असल्याने तिकडे कडक उन्हाळा तर उत्तर गोलार्धात हिवाळा आहे.
यावर्षी आकाशात अनेक घटनांची रेलचेल असुन त्यात ग्रहणे, उल्का वर्षाव, ग्रहांची युती-प्रतियुती, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, स्टार लिंक्स, ग्रह दर्शन, उदयास्त, अचानक दाखल होणारे धुमकेतू अशा अनेक आकर्षक घडामोडी बघता येतील. नववर्षात सूर्य, चंद्र व प्रत्येकी दोन अशी चार ग्रहणे असुन आपल्या वाट्याला मात्र फक्त एक ३ मार्चचे चंद्रग्रहण असेल. सध्या स्थितीत संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आकाशातील नवलाई दिसून येत असून सोबत सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरू ग्रह रात्रभर असल्याने आपल्या आनंदात विशेष भर पडेल. पूर्वेच्या अपूर्व नजाऱ्यात बहू परिचित मृगनक्षत्र, जरा डाव्या बाजूस मिथुन राशी व अधिक प्रकाशित दिसणारा गुरु ग्रह दिसेल.
उल्का वर्षाव आणि महत्वपूर्ण दिवस
पृथ्वी कक्षा आणि धुमकेतू वा लघुग्रह यांच्यातील वस्तूकण जेंव्हा पृथ्वी गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्या गेल्याने उल्का वर्षाव अनुभवता येतो. वर्षारंभी ३ व ४ जानेवारी, २३ एप्रिल, ५मे,२८ जुलै, १३ ऑगष्ट, २१ ऑक्टोबर, ६ व १२ नोव्हेंबर आणि १४ व २३ डिसेंबर या दिवशी तारे तूटतांना दिसतील.
ग्रह दर्शन आणि उदयास्त
- सध्या पूर्व आकाशातील गुरु ग्रह एक जुन रोजी कर्क राशीत व नंतर १७ जूलैला अस्त आणि मग १० ऑगस्टला पूर्वोदयानंतर ३१ ऑक्टोबरला सिंह राशीत प्रवेश.
- सर्वात तेजस्वी शूक्र ग्रहाचा अस्त असून १ फेब्रुवारीला पश्चिमेस १९ ऑक्टोबर पर्यंत व नंतर दिवाळी आधी दर्शनार्थ सज्ज होईल.
- सूर्याच्या जवळ असलेला बुध ग्रह कधी सूर्योदयापूर्वी पूर्वेस किंवा सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात पाहता येईल. लालसर रंगांचा मंगळ ग्रह या वर्षात अधिक वेळ सूर्य सान्निध्यात राहिल्याने कमी दर्शन देईल.
- इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि स्टार लिंक्स हे चांदणीच्या फिरत्या रूपात दिसतील.