दीक्षाभूमीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला नवे बळ, भंते ससाई यांच्या उपस्थितीत आकाश लामा व भंते विनयाचार्य एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 21:48 IST2025-08-31T21:47:11+5:302025-08-31T21:48:22+5:30
एकीने लढण्याचा केला निर्धार

दीक्षाभूमीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला नवे बळ, भंते ससाई यांच्या उपस्थितीत आकाश लामा व भंते विनयाचार्य एकत्र
नागपूर : महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आता बेकीने नव्हे तर एकीने लढण्याचा निर्धार आकाश लामा आणि भंते विनयाचार्य यांनी दीक्षाभूमीवर व्यक्त केला. रविवारी भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत दोघांनीही संघटीतपणे एल्गारची हाक दिली. त्यामुळे महाबोधी महाविहार मुक्तीच्या आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे. दीक्षाभूमीच्या सभागृहात हे तिघेही भंतेगण हातात हात घालून एकत्र आल्याने उपस्थित हजारो धम्मबांधवांनी आनंद व्यक्त केला.
बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी २०४ दिवसांपासून महाविहार मुक्तीचे आंदोलन सुरू आहे. दरम्यानच्या काळात विसंवादामुळे दोन्ही भंते वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मशाल मार्च व धम्मध्वज यात्रा नागपुरातूनच सुरू केली होती. मात्र, बौध्दांना असे वेगळे होणे अमान्य होते. एकत्र यावे यासाठी अनुयायी रेटा लावून होते. समाजबांधवांचा दबाव बघून दोघांनीही एकाच विचापीठावर येण्याचे मान्य केले. त्यानुसार, रविवारी पवित्र दीक्षाभूमीतील सभागृहाच्या धम्ममंचावर या दोन्हींसोबत भंते ससाईही आले. त्यांनी दोघांचेही हात हातात घेऊन संघटितपणे आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या दोन्ही भंतेंनी बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून, महाविहार बौध्दांच्या हातात देण्यासाठी आंदोलन व दबाव वाढविण्याचा निर्णय घेतला.
यावेळी भंते विनयाचार्य यांनी २ सप्टेंबर रोजी मुंबईच्या चैत्यभूमीवर होणाऱ्या संकल्प कार्यक्रमात आकाश लामा यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला लगेच होकार देत लामा यांनी दिल्लीतील कार्यक्रम रद्द करून चैत्यभूमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली.
संचालन बाळू घरडे यांनी केले. धम्ममंचवर सुनील सारीपुत्त, नितीन गजभिये उपस्थित होते. त्यापुवीं, आंबेडकरी गायक प्रकाशनाथ पाटणकर यांनी एकाहून एक सरस बुध्द व धम्मगीते सादर केले.
- दोन्ही भंते एकाच धम्ममंचावर आल्याने आंदोलनास बळ मिळेल. आगामी काळात आंदोलनाची दिशा ठरवावी. यापुढची सर्व आंदोलने संघटितरीत्या झाल्यास महाबोधी आंदोलनाला निश्चितच यश मिळेल.
- भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी
महाबोधीचे आंदोलन एकत्र व्हावे यासाठी धम्मगुरू भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई व दाजिंलींगचे भंते खेनचेन संगाय लोडई यांची प्रेरणा मिळाली. त्यामुळे हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. संघटित लढयातून महाविहार बौध्दांच्या ताब्यात घेऊ.
-भंते आकाश लामा
महाबोधी मुक्ती चळवळ ही आता भारत नव्हे तर जागतिक स्तरावर बौध्दांच्या अस्मितेशी जुळली आहे. केवळ महाबोधी महाविहार आमच्या अस्तित्वाचे आणि अस्मितेचे प्रतिक असल्याने, संघटीतपणे लढणे ही काळाची गरज होती. आता आंदोलनास अधिक बळ मिळेल.
-भंते विनयाचार्य