१ एप्रिलपासून विजेचे नवे दर ! स्मार्ट मीटर बसवल्यास 'कॅशबॅक' मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:58 IST2025-01-25T11:55:23+5:302025-01-25T11:58:44+5:30
Nagpur : महावितरणच्या दरवाढ याचिकेत 'टीओडी'चा प्रस्ताव; कमी वापर करणाऱ्या वीजग्राहकांना थोडा दिलासा तर जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीचा शॉक

New electricity rates from April 1! You will get 'cashback' if you install a smart meter
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणने राज्य वीज नियामक आयोगासमोर २०२५ ते २०३० या वर्षासाठी दाखल केलेली दरवाढ याचिका आता सार्वजनिक झाली आहे. १ एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू करण्यात येणार आहे. यामध्ये कमी वापर करणाऱ्या वीजग्राहकांना थोडा दिलासा तर जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीचा शॉक बसणार आहे.
याचिकेत घरगुती ग्राहकांनाही टीओडी (टॅरिफ ऑफ द डे) दराचा लाभ देण्याची परवानगी मागितली आहे. या अंतर्गत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत प्रतियुनिट ८० पैसे इतकी मोठी सूट दिली जाणार आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांना या काळात 'कॅशबॅक' मिळणार आहे. एकंदरीत महावितरणने यावेळी ग्राहकांना जबर धक्का दिलेला नाही.
महावितरणच्या स्मार्ट मीटरला होत असलेला विरोध विचारात घेता घरगुती ग्राहकांसाठी टीओडी दर लागू करेल. अशा आशयाची बातमी 'लोकमत'ने प्रकाशित केली होती. याचाच भाग म्हणजे कंपनीने स्मार्ट प्रीपेड मीटरचे नाव टीओडी मीटरमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणने आपल्या याचिकेत टीओडी दर लागू करण्याची परवानगी मागितली आहे. हे टीओडी दर केवळ स्मार्ट प्रीपेड मीटरपासून शक्य आहे. म्हणूनच, हा निर्णय स्मार्ट मीटरसाठी घेतल्याचे दिसते.
विजेच्या दराचा विचार करता प्रतियुनिट दर शून्य ते १०० युनिट्साठी आता ४.७१ रुपये असून तो ४.३७ रुपये करण्यात आला आहे. याहून अधिक युनिटचा वापर असल्यास वीजदर वाढीला सामोरे जावे लागणार आहे.
निश्चित शुल्कात वाढ
महावितरणने पुन्हा एकदा निश्चित शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती ग्राहकांना आता १२८ रुपये ऐवजी १३० रुपये द्यावे लागेल. व्यावसायिक ग्राहकांनाही आता ५१७ रुपयांऐवजी ५५० रुपये मोजावे लागणार आहेत.
जनसुनावणीनंतर निर्णय
नियामक आयोग आता महावितरणच्या याचिकेवर विविध शहरांमध्ये जनसुनावणी घेऊन निर्णय देणार आहे. २५ फेब्रुवारीला नवी मुंबई, २७ फेब्रुवारीला पुणे, २८ फेब्रुवारीला नाशिक, १ मार्चला छत्रपती संभाजीनगर, ३ मार्चला अमरावती आणि ४ मार्चला नागपूर येथे जनसुनावणी होणार आहे. १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील.
वापरावर किती बिल (स्मार्ट मीटरशिवाय)
युनिट आधीचे १ एप्रिलनंतर
० १२८ १३० रु.
१०० ७१६ रु. ७१३ रु.
२०० १८६२ रु. १९७८ रु.
३०० ३००८ रु. ३२३८ रु.
५०० ६१५२ रु. ६६३३ रु.