एसटीच्या ताफ्यात नवीन बसेस; रोज ८ ते १० हजार प्रवाशांची भर पडणार
By नरेश डोंगरे | Updated: April 25, 2025 20:23 IST2025-04-25T20:23:48+5:302025-04-25T20:23:58+5:30
लांब पल्ल्याच्या प्रवासावर पाठविणार, प्रवाशांना मिळणार 'नॉन स्टॉप'चा लाभ...

एसटीच्या ताफ्यात नवीन बसेस; रोज ८ ते १० हजार प्रवाशांची भर पडणार
नागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागाच्या ताफ्यात आणखी २० नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. प्रवाशांची गर्दी वाढली असतानाच या गाड्या आल्यामुळे एसटीच्या तिजोरीतही चांगली भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एसटीच्या नागपूर विभागात आठ डेपो (आगार) असून सध्यस्थितीत या आगारातून एकून ४१५ बसेसचे संचलन होते. यातील बऱ्याच बसेस जुन्या असल्याने कधी ही तर कधी ती बस रस्त्यात बंद पडत असते. अशात उन्हाळ्यात लग्नसराईची धूम असल्याने प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. बसस्थानकावर सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येते. एवढेच नव्हे तर प्रत्येक बस प्रवाशांची खच्चून भरून धावत असल्याचेही दिसून येते. प्रवाशी जास्त आणि बसेस कमी असल्याने अनेकदा कोणत्या मार्गावर बसेस पाठवायची आणि कोणत्या मार्गावर प्रवाशांना 'थांबा'चा संदेश द्यायचा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडतो. या स्थितीमुळे स्थानिक अधिकाऱ्यांकडून महामंडळाच्या शिर्षस्थांकडे यापूर्वी नवीन बसेस देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, आता आणखी २० नवीन डिझेल बसेस एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला मिळाल्या आहेत.
आरामदायक आसन अन् बरेच काही...
या २० बसेसपैकी १० गाड्या गणेशपेठ बस आगाराला, ५ इमामवाडा आणि ५ बसेस रामटेक आगाराला मिळाल्या आहेत. नवीन बसेस असल्यामुळे या बसेस छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेडसारख्या लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवाशी सेेवेत पाठविण्यात येणार आहेत. नवीन बसेसची आसन व्यवस्था आरामदायक आहे. पूश करून सिट मागेपुढे करता येते. तसेच या गाड्यांमध्ये अलार्म सिस्टम आणि दुसऱ्याही काही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रवासी वाढणार अन् उत्पन्नही
नागपूर विभागातून दररोज सुमारे दीड लाख ते १ लाख, ६० हजार प्रवासी प्रवास करतात. आता ४४ सिटर या नवीन बसेसची त्यात भर पडल्यामुळे आणखी ८ ते १० हजार प्रवासी वाढणार आहेत. अर्थात एसटीच्या नागपूर विभागाच्या तिजोरीला त्याचा चांगला फायदा होणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी दिली आहे.