Nepotism in the notorious gangster gang in Nagpur | नागपुरात कुख्यात गुंडाच्या टोळीत भाई-भतीजावाद

नागपुरात कुख्यात गुंडाच्या टोळीत भाई-भतीजावाद

ठळक मुद्देखंडणीसाठी शत्रुत्व : पुतण्याकडून काकाकडे १० लाखांच्या वसुलीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनीतील कुख्यात चिंतलवार टोळीतील काका-पुतण्यात जोरदार वैमनस्य निर्माण झाले आहे. गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड धाक निर्माण करणाऱ्या कुख्यात सुमित चिंतलवारने या टोळीचा म्होरक्या तसेच सुमितचा काका नयन चिंतलवार याला पिस्तुलाच्या धाकावर १० लाखाची खंडणी मागितली. तर, नयनने पुतण्याचा डाव उलटवून लावण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

उपराजधानीतील गुंडांच्या टॉप टेन टोळ्यांपैकी चिंतलवार टोळीचे नाव आहे. या टोळीतील सुमित, त्याचा काका नयन आणि साथीदारांविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी वसुली, अपहरण आणि मद्यतस्करीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काका पुतण्याची ही टोळी एक पाय कारागृहात तर दुसरा बाहेर ठेवून वावरते. लॉकडाऊनच्या कालावधीतच सुमित जामिनावर बाहेर आला. तेव्हापासून त्यांच्यात पैशाच्या वादातून कुरबुरी वाढल्या. हर्षदा चिंतलवारच्या तक्रारीनुसार, सुमित त्याचा काका नयन आणि नयनचा मुलगा अभिषेकला १० लाखांच्या खंडणीसाठी त्रास देत आहे. २३ ऑक्टोबरला सुमित त्याचे साथीदार मयूर सुर्वे आणि स्वप्निल भोयरसह नयनच्या घरावर चालून आला. सुमितने रिव्हॉल्वर आणि स्वप्निलने चाकू काढून नयनला १० लाखांची खंडणी मागितली. जीवे मारण्याची धमकी देऊन सुमित आणि साथीदारांनी नयनच्या हातातील अंगठी हिसकावून पळ काढला.

या घटनेची तक्रार नयनची पत्नी हर्षदा चिंतलवार हिने अजनी पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपी सुमितला अटक केली. त्याचा २७ ऑक्टोबरपर्यंत पीसीआरही मिळवला.

गँगवॉर भडकणार !

चिंतलवार टोळीतील काका-पुतण्याचे वैमनस्य टोकाला गेल्यामुळे या टोळीतील गुंडांमध्येही विभागणी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यात टोळीयुद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी अटकाव केला नाही तर मोठा गुन्हा घडण्याचीही शक्यता गुन्हेगारी वर्तुळात वर्तविली जात आहे.

Web Title: Nepotism in the notorious gangster gang in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.