निपाह व्हायरस : राज्यभरात ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:36 IST2018-05-22T00:36:00+5:302018-05-22T00:36:21+5:30
केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.

निपाह व्हायरस : राज्यभरात ‘अलर्ट’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.
केरळमध्ये या व्हायरसचा (विषाणू) इन्फेक्शनची लागण झालेल्या अन्य २५ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका परिचारिकेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याला गंभीरतेने घेत मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात रात्री ११ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. ‘लोकमत’शी बोलताना आरोग्य विभागाचे संचालक डॉ. कांबळे म्हणाले, सध्या तरी या ‘व्हायरस’चे रुग्ण महाराष्टÑात आढळून आलेले नाहीत. याच्यावर लस उपलब्ध नाही. परंतु सावधगिरी बाळगण्यासाठी आवश्यक उपाययोजनेच्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्या, मंगळवारी यावर परित्रक काढून सर्व आरोग्य अधिकाºयांना ते पाठविण्यात येईल.
काय आहे निपाह?
निपाह व्हायरस संसर्गजन्य आजार आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. सध्या यावर लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) पहिल्या १० जीवघेण्या आजारात या निपाह व्हायरसचा समावेश आहे. या आजाराची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ७० टक्के असते.
लक्षणे
ताप, डोके दुखणे, अशक्तपणा, श्वसनाचे आजार, मानसिक गोंधळ उडणे आदी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाण्याची शक्यता असते. यावर उपचार नसल्याने आजारी डुक्कर, वटवाघूळ यांच्याशी संपर्क टाळण्याचा सल्ला केरळमध्ये देण्यात येत आहे.
फळ खाणारे वटवाघूळ विषाणूचे वाहक
उपलब्ध माहितीनुसार, या विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या घरात वटवाघूळांनी चावा घेतलेले आंबे आढळून आले. यामुळे फळ खाणारे वटवाघूळ या विषाणूचे नैसर्गिक वाहक असल्याचे मानले जात आहे.