प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्ये आवश्यक
By Admin | Updated: October 6, 2014 00:54 IST2014-10-06T00:54:30+5:302014-10-06T00:54:30+5:30
नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे.

प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्ये आवश्यक
पीस फाऊंडेशन : अरुण भार्गव यांचे प्रतिपादन
नागपूर : नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे. याशिवाय प्रगती शक्य नसल्याचे प्रतिपादन पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण भार्गव यांनी केले.
पीस फाऊंडेशनच्यावतीने रविवारी पहिला वार्षिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘नीतीमूल्यांचा प्रसार आणि निरंतर शिक्षण’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. मिराज शेख, रंधीर जव्हेरी व प्रीतेश टंक उपस्थित होते. सिव्हिल लाईन्स परिसरातील उद्योग भवनामधील व्हीआयएच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित एस. प्रभुरामन यांनी नीतीमूल्यांचे कुणासाठी पालन करायचे, स्वत:साठी की, समाजासाठी याचा सर्वप्रथम विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, नीतीमूल्यांचे पालन करताना, अनेक समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रथम त्यांना तोंड देण्याची तयारी करावी लागते. राजेंद्र मिश्रा यांनी विद्यार्थ्यांमध्ये नीतीमूल्य रुजविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून, यातून समाजात चांगले नागरीक तयार होतील, असे सांगितले. मात्र सध्या शाळा-कॉलेज केवळ कारखाने बनले असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
शाळा-कॉलेजमध्ये नीतीमूल्यांचे कोणतेही शिक्षण मिळत नाही. अशा शाळा-महाविद्यालयांनी स्वत: पुढाकार घेऊन पीस फाऊंडेशनशी जुळले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच प्रीतेश टंक यांनी पीस फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत, शहरातील विविध शाळांमध्ये ‘यंग चॅप्टर’ ची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी गतवर्षभरात विविध प्रसंगी समाजातील गरजूंची मदत करणाऱ्या धाडसी चिमुकल्यांना पाहुण्यांच्या हस्ते एक पुस्तक व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच एस. प्रभुरामन व राजेंद्र मिश्रा यांना स्मृतिचिन्ह देऊ न त्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. रिता भार्गव व डॉ. वृंदा अग्रवाल यांनी केले. (प्रतिनिधी)