नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) पुढाकाराने मागील सात महिन्यात तब्बल १ लाख १०८ महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. यात स्तन व गर्भाशयाच्या ग्रीवा कर्करोग संशयित ८९४ महिला आढळून आल्या. या महिलांची पुढील तपासणी व उपचारासाठी पाठपुरावा केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची कर्करोग तपासणी पहिल्यांदाच झाली आहे.
भारतामध्ये दरवर्षी सुमारे १४.६ लाख कर्करोगाचे नवे रुग्ण आढळून येतात. त्यात ७ लाख ४९ हजार २५१ कर्करोगाचे महिला रुग्ण असतात. त्यापैकी २६ टक्के स्तनाचा कर्करोग, ८ टक्के गर्भाशायाच्या ग्रीवाचा कर्करोगाचे रुग्ण असतात. महिलांमध्ये या दोन्ही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या कर्करोगाचे लवकर निदान व उपचार झाल्यास गुंतागुंत टाळून जीवाचा धोक्याला दूर ठेवणे शक्य आहे. याची दखल घेत मेयोने महिलांची कर्करोग तपासणी प्रकल्प हाती घेतला.
१ हजार ८७७ शिबिरांमधून तपासणी मेयो रुग्णालयाच्या पुढाकारात जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हील सर्जन, महानगरपालिका आणि इतर संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने २४ सप्टेंबर २०२४ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान कर्करोग तपासणी योजना राबविण्यात आली. या सात महिन्यांच्या १ हजार ८७७ शिबिरांमधून १४० ठिकाणी १ लाख १०८ महिलांचे स्तन व गर्भाशयाच्या ग्रीवाची तपासणी करण्यात आली.
९३ हजार महिलांची स्तन कर्करोगाची तपासणीया विशेष प्रकल्पांतर्गत ९३ हजार ६१२ महिलांची स्तन कर्करोगाची तपासणी करण्यात आली. यातील ३९७ महिला कर्करोग संशयित आढळून आल्या. त्यांना पुढील तपासणी व उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. यात कर्करोगाचे निदान झालेल्या २ रुग्णांवर नुकतेच उपचार पूर्ण झाले असून उर्वरीत रुग्णांचा पाठपुरावा केला जात आहे.
६ हजार महिलांच्या गर्भाशयाची तपासणी विशेष शिबिरात ६ हजार ४९६ महिलांची गर्भाशयाच्या ग्रीवा कर्करोगाची तपासणी करण्यात आली. यात ४९७ महिल कर्करोग संशयित आढळून आल्या. यातील २ महिलांना कर्करोगाचे निदान झाले. त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. उर्वरीत महिलांवरील उपचारासाठी पाठपुरावा केला जात आहे.
शहर ते तालुकापातळीवर तपासणीनागपूर जिल्ह्यातील विविध तालुके आणि रुग्णालयांमध्ये कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. यात ग्रामीणमधील रामटेक, सावनेर, कामठी, काटोल, कळमेश्वर, उमरेड येथील शासकीय रुग्णालयांत, शहरातील मेयो, मेडिकल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कामठी रोड, डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालय, लता मंगेशकर रुग्णालय व मातृ सेवा संघ येथे महिलांची तपासणी करण्यात आली.
कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान आवश्यक महिलांमधील स्तन व गर्भाशायाच्या ग्रीवाचा कर्करोगावर सुरुवातीच्या टप्प्यातच उपचार झाल्यास कर्करोगाची गुंतागुंत टाळता येते. त्यामुळे या कर्करोगाचे तातडीने निदान होणे गरजेचे आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सात महिन्यात तालुकास्तरावरील व शहरातील १ लाखांवर महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. यात आढळून आलेल्या कर्करोग संशयित महिलांवरील उपचारासाठी पाठपुरावा केला जात आहे.-डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, मेयो