एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 23:16 IST2026-04-12T23:15:41+5:302026-04-12T23:16:23+5:30
चार आरोपींना अटक, ड्रग्ज तस्करांना मोठा धक्का

एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
नागपूर : ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (एनसीबी) नागपुरातून २० कोटी रुपये किंमतीचा २१० किलो गांजा व इतर अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ओडिशातून महाराष्ट्रात आलेल्या ट्रकमधून हा गांजा व इतर माल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत ‘एनसीबी’च्या पथकाने चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना चांगलाच धक्का बसला आहे.
‘एनसीबी’ मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली. ओडिसावरून महाराष्ट्रात नागपूरमार्गे मोठ्या प्रमाणात गांजा व इतर अंमली पदार्थांची तस्करी होते. ट्रक्सच्या माध्यमातून सर्वसाधारणत: हा माल पाठविण्यात येतो. त्यानंतर तो महाराष्ट्रातील विविध भागांत पेडलर्सच्या माध्यमातून पोहोचविण्यात येतो. ओडिशातून २१० किलोचा माल येणार असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकाने शनिवारी नागपुरातील पारडीजवळ सापळा रचला व ट्रकला थांबविले.
ट्रकची झडती घेतली असता त्यात काहीच आढळले नाही. मात्र त्यानंतर ट्रकची बारीक पाहणी केली असता त्यात धातूच्या पत्र्याच्या खाली तयार केलेल्या जागेत गांजाची पोती लपवून ठेवण्यात आली होती. ‘एनसीबी’च्या पथकाने २१० किलोचा माल जप्त केला. संबंधित ट्रकची नोंदणी पश्चिम बंगालची होती. ‘एनसीबी’च्या पथकाने आर.कुमार व पी.कुमार यांना अटक केली. आरोपींनी संपूर्ण माल हा ओडिसातील संभलपूर येथून आणल्या जात होता अशी माहिती दिली.
नागपुरातील स्थानिक पेडलर वर्मा व पाटील यांनादेखील अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात स्थानिक पोलिसांना पुर्वकल्पना देण्यात आली नव्हती. ‘एनसीबी’च्या पथकाकडून तपास सुरू आहे.
महाराष्ट्रात पाठविण्यात येणार होता गांजा
जप्त करण्यात आलेला गांजा नागपूरसह अमरावती, अकाेला, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे पुरवठा करण्याचा तस्करांची याेजना हाेती. त्यानंतर छाेट्या पातळीवरील पेडलर्सर्माफत हा माल ग्राहकांपर्यंत पाेहाेचवला जाणार हाेता. ओडिसातून येणाऱ्या गांजा तस्करांसाठी नागपूर हा ट्रान्जिट रूट आहे. येथून मग वेगवेगळ्या ठिकाणी गांजा वळता करण्यात येतो.