कोराडी देवी येथील नवरात्र यात्रा यंदा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 23:36 IST2020-10-14T23:34:48+5:302020-10-14T23:36:30+5:30
Koradi Devi Temple ban for devotees कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानतर्फे दरवर्षी अश्विन नवरात्रात आयोजित करण्यात येणारी नवरात्र यात्रा यंदा स्थगित करण्यात आली असून १७ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत नवरात्र असतानाही भाविकांना दर्शनाला लाभ घेता येणार नाही, असे संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

कोराडी देवी येथील नवरात्र यात्रा यंदा स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानतर्फे दरवर्षी अश्विन नवरात्रात आयोजित करण्यात येणारी नवरात्र यात्रा यंदा स्थगित करण्यात आली असून १७ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत नवरात्र असतानाही भाविकांना दर्शनाला लाभ घेता येणार नाही, असे संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
दरवर्षी कोराडी मंदिर येथे नवरात्रानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता व कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान येथे नवरात्र महोत्सव २०२० साजरा करण्यात येणार नाही. परंतु नवरात्राच्या या कालावधीत होणारी नियमित पूजा, आरती, हवन करण्यात येईल. यावर्षी अखंड ज्योतीची स्थापना केल्यामुळे ज्योती कक्षात एका दिवसाला ५० ज्योती धारकांना प्रवेश देण्यात येईल. तसेच कोराडी मंदिर बंद असल्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून यूसीएन श्रद्धा चॅनेलवर देवीच्या दर्शनाचे थेट प्रक्षेपण सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत करण्यात येणार आहे. शासनाच्या निदेर्शानुसार मंदिर भाविकांसाठी बंद असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे, अशी विनंतीही विश्वस्त मंडळातर्फे भाविकांना करण्यात आली आहे.