लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेला ‘ब्रीद’ देणाऱ्या नागपूरने पुन्हा एक माैलिक जबाबदारी सांभाळली आहे. आता दिल्लीत स्फोटाचा तपास करणाऱ्या पथकाचे नेतृत्व नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे करत आहेत. हे वृत्त आल्यापासून महाराष्ट्राच्या आयपीएस लॉबीतून एक वेगळाच अभिमान व्यक्त होत आहे.
अत्यंत धाडसी, कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी, कर्तृत्त्वत्वान आणि अत्यंत प्रामाणिक असलेल्या भारतातील ‘टॉप-१० आयपीएस’ अधिकाऱ्यांमध्ये विजय साखरे यांचे नाव घेतले जाते. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी)मधून १९८९ ते १९९२ या कालावधीत बीई आणि १९९२ ते ९३ दरम्यान आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९९६ मध्ये ते आयपीएस अधिकारी बनले.
त्यांना त्यावेळी केरळ कॅडर प्रदान करण्यात आले. केरळमधील विविध शहरांत विविध पदांवर त्यांनी काम केले. कोचीचे पोलिस आयुक्त असताना साखरे यांनी अनेक क्लिष्ट प्रकरणांचा छडा लावला. त्यांची कर्तृत्वशैली लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वी त्यांची 'एनआयए'त (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आयजी म्हणून नियुक्ती केली. सप्टेंबर २०२५ मध्ये केंद्र सरकारने त्यांची एनआयएचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) म्हणून नियुक्ती केली. आता देश हादरवणाऱ्या दिल्लीतील कार स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्यानंतर एनआयए प्रमुख सदानंद दाते यांनी साखरे यांची स्फोटाच्या चौकशी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. हा ‘मान मिळाल्याचे वृत्त’ आल्यापासून नागपूर-विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम पोलिस अधिकाऱ्यांची ‘मान उंचावल्याची भावना’ व्यक्त होत आहे.
उल्लेखनीय असे की, गेल्यावर्षी एनआयएला ‘राष्ट्र रक्षणम्, आद्य कर्तव्यम्’ हे ब्रीद वाक्य निवृत्त आयपीएस आणि नागपूरचे माजी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले होते. याबद्दल एनआयए प्रमुख दाते यांनी काही महिन्यांपूर्वीच डॉ. उपाध्याय यांचा एका पत्रातून गाैरवही केला होता.
आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा अन्...
आयपीएस लॉबीतील निकटस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना साखरे यांनी वाहन चोरांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लावून या टोळीचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. या कामगिरीनंतर आयपीएस विजय साखरे यांचे नाव देशभरातील तपास यंत्रणांत चर्चेला आले होते.
Web Summary : Nagpur's IPS Vijay Sakhare leads Delhi blast probe. Known for intellect and integrity, Sakhare, an NIA ADG, previously exposed an international vehicle theft ring. Earlier, Nagpur's Bhushan Kumar Upadhyay gave NIA its motto.
Web Summary : नागपुर के आईपीएस विजय साखरे दिल्ली विस्फोट जांच का नेतृत्व कर रहे हैं। अपनी बुद्धिमत्ता और ईमानदारी के लिए जाने जाने वाले साखरे, एनआईए एडीजी, ने पहले एक अंतरराष्ट्रीय वाहन चोरी गिरोह का पर्दाफाश किया था। इससे पहले, नागपुर के भूषण कुमार उपाध्याय ने एनआईए को उसका आदर्श वाक्य दिया था।