राष्ट्रीय महामार्ग अंधारात : पथदिवे लागले, मात्र उजेड पडेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:45 IST2019-10-01T00:44:35+5:302019-10-01T00:45:42+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यान प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग अंधारात : पथदिवे लागले, मात्र उजेड पडेणा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सरकार धडपडते आहे. रस्त्यांचा विस्तार केला जात आहे. उपाययोजना करण्यात येत आहे. पण काही महामार्गावर सोयी सुविधा करूनही प्रशासनाकडून खरचं हलगर्जीपणा होताना दिसतोय. राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यानचा रस्त्यावर याचे उदाहरण बघायला मिळते. या रस्त्यावर प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना सरकारी काम महिनोंमहिने थांब याचाच प्रत्यय येतो आहे. राष्ट्रीय महामार्गाचा विद्यापीठ केम्पस ते वाडी दरम्यानचा रस्ता गेल्या वर्षी अत्यंत निकृष्ट झाला होता. त्यावर अनेक अपघात होऊन काही वाहनचालकांचा जीवही गेला होता. नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बोलणं करून रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, शहराच्या हद्दीत असूनही रात्रीच्या वेळी या महामार्गावर दिवाबत्तीची सोय नव्हती. विद्यापीठ कॅम्पसपासून काचीमेट, कमलानगर, दाभा आणि वाडीच्या दिशेने जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना अत्यंत धोकादायक स्थितीत वाहन चालवावे लागत होते. नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेकडे या मार्गावर दिवाबत्तीची सोय करण्याची मागणी केली. पहिले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आणि महापालिकेने प्राधिकरणाकडे बोट दाखवत हे आमचे काम नाही असेच धोरण ठेवले. मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात आल्यावर सामोपचाराने निधीची तरतूद करण्यात आली आणि अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला विद्यापीठ कॅम्पस ते दहा नंबर नाका दरम्यान रस्ते दुभाजकावर वीजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर फिलिप्स कंपनीचे एलईडी लाईट्स ही लावले गेले. ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबरही संपला तरी या मार्गावर एक ही दिवा प्रकाशित झालेला नाही. त्यामुळे ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण या मार्गावर सत्य असल्याचे प्रत्यय वाहन चालकांना रोज येत आहे.
अंधारामुळे जनावरांचा मृत्यू
या मार्गावर दुभाजक चुकीचे असून त्याची उंची कमी असल्याने समोरून येणाºया वाहनाच्या हेडलाईटचे उजेड वाहनचालकांच्या डोळ्यावर पडतो. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एक म्हैस रात्रीच्या काळोख्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होवून रस्त्यावर पडली होती. अंधारामुळे इतर वाहनांना ती दिसली नाही आणि तिला इतर वाहनांनी धडक दिल्याने म्हैस मृत्युमुखी पडली. तर काही वाहनचालक ही जखमी झाले.
रस्ता अंधारात ठेवण्याचे कारण काय?
अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर नागरिकांनी दिवाबत्तीची सोय प्रशासनाकडून करवून घेतली. वीजेचे खांब लावण्यात त्यावर महागडे लाईट्स लावण्यात शासनाचा मोठा निधी खर्च झाला. निधी खर्च झाला आहे. पण ते पथदिवे ५० दिवस उलटल्यानंतर प्रकाशित झाले नाही. काम झाल्यानंतरही रस्त्यावर अंधार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. आणखी काही जणांचे अपघातात बळी गेल्यानंतरच हे मार्ग प्रकाशित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने ठरविले आहे का? असाही प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.