जनता समजदार; कोल्हापूरप्रमाणे भाजपची राज्यभर पोलखोल होणार; नाना पटोलेंची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 18:41 IST2022-04-21T18:31:50+5:302022-04-21T18:41:48+5:30
योग्य वेळी जनता मतपेटीतून भाजपची पोलखोल करेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

जनता समजदार; कोल्हापूरप्रमाणे भाजपची राज्यभर पोलखोल होणार; नाना पटोलेंची टीका
नागपूर : ‘सर्वच पक्ष निवडणुकांची तयारी करीत आहेत. भाजपने पोलखोल यात्रा सुरू केली आहे. मात्र, जनता समजदार आहे. कोल्हापूरच्या जनतेने भाजपची चांगलीच पोलखोल केली. आता राज्यभरातील जनता मतदानाच्या माध्यमातून भाजपची पोलखोल करेल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.
पटोले म्हणाले, ‘केंद्रातील भाजप सरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आता केंद्रातील खुर्ची वाचवण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतच आहे. राज्यातील मुस्लीम समाजाने ७२ टक्के भोंग्याचे आवाज कमी केले आहेत. काहींनी भोंगे काढले आहेत. राज्यातील भाईचारा संपू नये, यासाठी मुस्लीम समाज पुढाकार घेत असेल तर हे गौरवास्पद आहे.’
‘भाजपने पाच महिने एसटीचे आंदोलन तेवत ठेवले. जनतेला त्रास दिला. सदावर्तेंकडे नोटा मोजण्याची मशीन सापडली. ते कुठल्या नोटा मोजत होते, याची चौकशी होण्याची गरज आहे. एसटी कामगारांच्या मागण्या योग्य आहेत. सरकाने त्यांना न्याय द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली.