जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावे योग्यवेळी उघड करणार : पंकज भोयर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 20:21 IST2025-08-31T20:21:21+5:302025-08-31T20:21:58+5:30
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही

जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावे योग्यवेळी उघड करणार : पंकज भोयर
गणेश हूड / नागपूर
नागपूर : गणेशोत्सवाच्या गर्दीत मुंबईत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय अजेंडा राबवला जातोय का, अशी शंका आहे. जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणारे कोण आहेत, याची यादी आमच्याकडे आहे. योग्यवेळी त्यांची नावे उघड केली जातील,” असा इशारा गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. त्याचा परिणाम म्हणून नागपुरात ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण करण्यात सुरू आहे. परंतु जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. अशी ग्वाही पंकज भोयर यांनी दिली.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली आहे. हैद्राबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना ओबीसी दाखले दिल्या गेले. परंतु असे दाखले सरसकट मराठा समाजाला देता येणार नाही. सगेसोयऱ्यांनाही असे दाखले देता येणार नाही. मराठा आरक्षणाची मागणी आजचीच नाही. असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का केले जात आहे असा प्रश्न पंकज भोयर यांनी उपस्थित केला.
वास्तविक देवेंद्र फडणवीस सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार रामदास तडस, सुनील मेंढे, आमदार कृष्णा खोपडे, समीर मेघे, प्रवीण दटके, प्रताप अडसड, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
...तर कायदेशीर कारवाई होईल
जरांगे यांच्या आंदोलनाला मुदतवाढ दिलेली नाही. परंतु लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पाच हजार आंदोलकांचा आकडा दिला होता. परंतु त्याहून जास्त आंदोलक आले. कायद्याचे उल्लघन करून चुकीचे काही होत असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पंकज भोयर यांनी यावेळी दिला.