गोरेवाडाच्या प्रवेशद्वारापुढे झळकवला ‘गोंडवाना’चा नामफलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:16+5:302021-02-05T04:53:16+5:30
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून वातावरण तापतच आहे. दरम्यान आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ...

गोरेवाडाच्या प्रवेशद्वारापुढे झळकवला ‘गोंडवाना’चा नामफलक
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून वातावरण तापतच आहे. दरम्यान आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी या आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यानाच्या प्रवेशद्वारपुढे गोंडवाना गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यान असे नाव असलेला फलक झळकवला आणि निदर्शने केली. यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी चार पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावरून संतप्त समाजबांधव ठाण्यात धडकल्यावर सायंकाळी सर्वांना सोडून देण्यात आले.
शांतपणे आंदोलन करण्याची आमची मानसिकता असताना पोलीस दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी महापौर मायाताई इवनाते यांनी केला आहे. तर, प्रकल्पाच्या प्रवेशद्वरासमोर निदर्शने केल्याने केवळ ताब्यात घेतले होते, सायंकाळी सोडून देण्यात आले, असे गिट्टीखदान पोलिसांनी सांगितले आहे.
या संदर्भात मायाताई इवनाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या सूचनेवरून विशेष गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तांसोबत जिमखान्यामध्ये रविवारी दुपारी समाजबांधवांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पोलिसांनी शांतपणे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. ही विनंती मान्य करून आंदोलनासाठी जागा द्यावी, अशी मागणीही पोलिसांकडे केली होती. बैठक शांतपणे पार पडली असतानाही पोलिसांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर मडावी, विदर्भ युवा अध्यक्ष दिनेश शेराम, उपाध्यक्ष विजय परतेकी आणि सहसचिव सुरेंद्र नैताम यांना ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नेले आणि दिवसभर बसवून ठेवले. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्यांनाही ठाण्यात बसवून ठेवल्याचा आरोप इवनाते यांनी केला आहे.
तर,पोलिसांच्या मते, हे चारही व्यक्ती दुपारी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करून फलक झळकवत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्याक कारणावरून ताब्यात घेतले, त्यानंतर सोडून दिल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, सायंकाळी सुमारे १०० ते १५० नागिरकांचा जमाव गिट्टीखदान पोलीस ठाण्यासमोर गोळा झाला होता. वाद वाढल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले.
...
बैठकीवर बहिष्कार
पोलिसांनी सोमवारी दुपारी ११ वाजता जीमखाना येथे आदिवासी समाज संघटना व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आंदोलनाबाबत तोडगा काढण्याचे ठरले होते. मात्र पोलिसांच्या या वर्तणुकीचा निषेध म्हणून बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संघटनांनी घेतल्याचे दिनेश शेराम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
...