नागपूरचा तान्हा पोळा अन् मारबत : लोकजीवनातील विडंबनात्मक आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:02 IST2025-08-18T17:01:44+5:302025-08-18T17:02:14+5:30

उत्सवांचा नागपूर ब्रँड : तान्हा पोळा शिवाराचा, मारबत जनतेचा आवाज!

Nagpur's Tanha Pola and Marbat: An ironic mirror of folk life | नागपूरचा तान्हा पोळा अन् मारबत : लोकजीवनातील विडंबनात्मक आरसा

Nagpur's Tanha Pola and Marbat: An ironic mirror of folk life

राहुल भडांगे
नागपूर :
विदर्भात, विशेषतः नागपूरमध्ये, तान्हा पोळा आणि मारबत या दोन परंपरा ठळकपणे सुरू आहेत. या दोन्ही प्रथांचा उगम धार्मिक श्रद्धेत असला तरी त्यांचा विस्तार सामाजिक जाणिवा, वैचारिक उपहास आणि राजकीय विडंबन या स्वरूपात झाला आहे. नागपूरच्या लोकजीवनाचा अभ्यास करताना या परंपरांचे महत्त्व विशेष अधोरेखित होते.


तान्हा पोळा हा सण कृषिप्रधान संस्कृतीतून उगम पावलेला आहे. हा प्रौढ शेतकऱ्यांच्या बैलांचा सण असला तरी मुलांमध्ये शेतीविषयी प्रेम व आत्मीयता निर्माण करण्यासाठी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी मुले मातीचे किंवा लाकडी बैल रंगवून सजवतात, त्यांची मिरवणूक काढतात आणि गाणी गातात. धार्मिक विधीच्या चौकटीत दिसणारा हा उत्सव प्रत्यक्षात पुढील पिढ्यांना शेतीशी जोडणारा सांस्कृतिक पूल आहे. लोकसंस्कृती अभ्यासक डॉ. शंकर गोरे म्हणतात, तान्हा पोळा हा केवळ मुलांचा खेळकर सण नसून बालमनावर कृषी परंपरेचे संस्कार करून त्याचे संवर्धन करणारे साधन आहे. नागपूरसारख्या नागरी भागातही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण तो मुलांना त्यांच्या मूळ मातीशी व शेतकरी जीवनाशी जोडून ठेवतो. याच्या उलट मारबत परंपरा ही नागपूरकरांच्या सामाजिक जाणीवेचा प्रखर उपरोधक आविष्कार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या १९व्या शतकात प्लेग, देवीसारख्या महामारींपासून सुटका मिळावी या हेतूने मोठ्या मूर्ती तयार करून त्यांची मिरवणूक काढून शेवटी त्यांना जाळण्याची प्रथा सुरू झाली. अशुभ शक्तींचा नाश करण्याची ही प्रतीकात्मक पद्धत पुढे विकसित होऊन समाजातील दोषांवर आणि राजकीय दांभिकतेवर प्रहार करणाऱ्या परंपरेत रूपांतरित झाली. नागपूरच्या लोकसंस्कृतीत मारबत म्हणजे उपरोधाचा सार्वजनिक उत्सव मानला जातो. मारबत परंपरेत काळी मारबत आणि पिवळी मारबत या दोन मूर्ती प्रमुख मानल्या जातात. काळी मारबत ही सुरुवातीला महामारी आणि दुष्टशक्तींच्या नाशाचे प्रतीक होती. ती आजही समाजातील अशुभ प्रवृत्ती, चालीरीती आणि अन्यायकारक गोष्टींवर प्रहार करणारी मानली जाते. पिवळी मारबत ही फितुरी, दांभिकता आणि असत्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. स्थानिक परंपरेत पिवळा रंग हा मत्सर व दुहीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे पिवळी मारबत म्हणजे समाजातील बनावटपणा, खोटेपणा आणि फसवणूक यांचा उपहासात्मक नाश. या दोन पारंपरिक मूर्तीसोबत दरवर्षी नव्या बडग्या तयार होतात. हे बडग्या म्हणजे चालू घडामोडींवरील उपहासात्मक पुतळे. त्यांच्यावर महागाई, बेरोजगारी, वाहतूक कोंडी, स्त्रीहक्क, पर्यावरणीय संकटे अशा असंख्य मुद्द्यांवरील थेट घोषवाक्ये लिहिली जातात. लोक त्या घोषणांतून समाजमनातील राग आणि नाराजी विनोदाच्या स्वरूपात व्यक्त करतात. इतिहासकार प्रल्हाद देशमुख यांनी मारबतला 'लोकशाहीतील जनतेची उपरोधात्मक मतदानपेटी' म्हटले आहे. कारण सामान्य माणूस थेट सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकत नसला तरी दरवर्षी मारबतच्या फलकांवर आणि पुतळ्यांवरून तो निडरपणे टीका करतो.. नागपूरकरांसाठी हा केवळ उत्सव नाही, तर आपली नाराजी व्यक्त करण्याचा सामाजिक व राजकीय मार्ग आहे. 


नागपूरकरांची एक वेगळीच खासियत आहे. ते सण साजरे करतात पण त्यातून समाजालाही आरसा दाखवतात. लहान मुलं मातीच्या बैलांच्या मिरवणुकीत रमलेली असतात आणि मोठी माणसं मारबतच्या पुतळ्यांवरून नेत्यांना, भ्रष्टाचाराला आणि महागाईला सरळ जाळून टाकतात. एका बाजूला तान्हा पोळा पोरांना शेतीची गोडी शिकवतो, तर दुसऱ्या बाजूला मारबत समाजातील कडू सत्यावर हसत-हसत चिमटे काढतो. धर्म, संस्कृती, उपहास आणि जनमत या सगळ्यांचा मेळ घालणाऱ्या या परंपरा म्हणजे नागपूरच्या लोकजीवनाचा जिवंत रंगमंचच म्हणावा लागेल. इथे सण हे केवळ आनंदोत्सव नसून लोकांच्या तक्रारींचं ज्वालामुखीचं रूप धारण करतात.

Web Title: Nagpur's Tanha Pola and Marbat: An ironic mirror of folk life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर