नागपूरचे 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न 'खड्डा सिटी' या वास्तवात उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 20:09 IST2025-07-21T20:08:10+5:302025-07-21T20:09:27+5:30

Nagpur : गेल्या तीन वर्षात नागपूरच्या रहिवाशांची दुर्दशा होत आहे. जनतेची प्रशासनापुढे सुनावणी होत नाही. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी अवस्था झाली आहे.

Nagpur's dream of 'Smart City' becomes a reality with 'Khadda City' | नागपूरचे 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न 'खड्डा सिटी' या वास्तवात उतरले

Nagpur's dream of 'Smart City' becomes a reality with 'Khadda City'

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूरचे एकेकाळचे 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न आता 'खड्डा सिटी' या वास्तवात उतरले आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांपेक्षा खड्यांची संख्या अधिक वाटावी अशी अवस्था आहे. एकीकडे आयुक्त विकासकामांचे डोलारे उडवतात, तर दुसरीकडे रस्त्यांवरील खड्डे नागपूरकरांचे जीव धोक्यात घालतात. महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचा ढिसाळ कारभार, त्यातही वारंवार देण्यात येणाऱ्या 'सूचना' फक्त कागदापुरत्या राहतात. जनतेचे आरोग्य, वेळ आणि आर्थिक नुकसान याचा कोणीही हिशेब ठेवत नाही. महापालिकेचे अधिकारी जणू 'खड्डे झाकायचे स्वप्न' बघत कुंभकर्णी झोपेत आहेत.


गेल्या तीन वर्षात नागपूरच्या रहिवाशांची दुर्दशा होत आहे. जनतेची प्रशासनापुढे सुनावणी होत नाही. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी अवस्था झाली आहे. शहरातील सिवर लाइन व गडर लाइन चोक होत आहे.


एनएचएआय, महारेल, महामेट्रो, नासुप्र, पीडब्ल्यूडी, ओसीडब्ल्यू सहित अन्य यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून, लोकांना त्यामुळे आता त्रास व्हायला लागला आहे. मात्र, महापालिकेचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहे. त्यांच्याकडून जनसमस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.


मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बैठक घेऊन पावसाळ्यात रस्त्याचे खोदकाम बंद करण्यास लावले होते. मात्र, अजूनही खोदकाम सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात ड्रेनेज लाइनचे काम सुरू आहे. मात्र, त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून, तीन ठेकेदारांवर एक कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे.तरीही त्यांच्या कामात सुधारणा आली नाही.


महावितरणकडून केबल टाकण्याचे काम सुरू असून, त्यासाठी फुटपाथ व रस्ते खोदले जात आहेत. एकंदरीतच जनतेला अडचणींचा सामना करावा लागतोय, पण त्यांच्या वेदना समजणार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय.


महारेलने केले रस्ते उद्ध्वस्त
एमआरआयडीसी (महारेल) कडून शहरात पाच ठिकाणी उड्डाणपुलाचे काम व अंडरपासचे काम केले जात आहे. त्यासाठी रस्त्यांना खोदण्यात आले आहे. अग्रसेन चौकाजवळ उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मनपाच्या हॉटमिक्स विभागाकडून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, मनमानी खोदकामामुळे रस्ते खराब झाले आहेत.


या रस्त्याची स्थिती खराब

  • केडीके कॉलेज ते जगनाडे चौक होत रेशीमबागपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने रस्ते खराब झाले आहेत. जगनाडे चौकाचे अस्तित्वच संपल्यागत आहे. येथून पायी जाणाऱ्यांमध्येही भीतीचे सावट आहे.
  • शिवाजी चौक, वर्धमान नगर ते वाठोडा डी मार्टपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. दुचाकी चालविणे कठीण झाले आहे, किरकोळ अपघात होत आहेत.
  • पारडी उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे; पण उड्डाणपुलाच्या खालच्या भागातील रस्त्याचे बांधकाम अजूनही नीट झालेले नाही. प्रजापतीनगर ते डे-टू-डे वर्धमाननगरपर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करून सोडण्यात आले आहे. पारडी उड्डाणपुलाच्या डांबरी रस्त्यांची गिट्टी निघाली आहे.
  • सेंट्रल एव्हेन्यू रोडवर केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविले नाही. दारोडकर चौकात रस्ता खोदून बराच कालावधी झाला आहे. खोदकामाची माती रस्त्यावर पसरली आहे.
  • आयनॉक्स थिएटर ते गंगाबाई घाट या रस्त्याचा वरचा थर उखडला आहे. वाहनांना झटके बसत आहेत. टेलिफोन एक्सचेंज चौक ते गंगाबाई घाट चौकदरम्यान रस्ताही खराब झाला आहे.

Web Title: Nagpur's dream of 'Smart City' becomes a reality with 'Khadda City'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.