नागपूरकरांना अनुभवता येणार लाइट, कॅमेरा, ॲक्शनची कमाल; रामटेकमधील नवरगावात साकारणार 'फिल्मसिटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:14 IST2024-12-10T17:12:18+5:302024-12-10T17:14:42+5:30
Nagpur : १२८.३५ एकर जागा निश्चित करण्यास मान्यता

Nagpurkars can experience the magic of light, camera, action; 'Filmcity' to be built in Navargaon in Ramtek
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/रामटेक : देशाचे केंद्रबिंदू नागपुरात आहे. त्याचप्रमाणे अनेक ऐतिहासिक वास्तू, स्थळे आहेत. आता 'फिल्म सिटी'ही (चित्रनगरी) साकार होणार आहे. यासाठी रामटेक तालुक्यातील नवरगावाची निवड करण्यात आली आहे. लवकरच याचे कामही सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतात पहिल्यांदा मराठी माणसाने मराठी चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपट निर्मितीचा पाया रचला. चित्रपटांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्यासाठी मुंबई व कोल्हापूर येथील चित्रपट सृष्टीच्या धर्तीवर नागपूर येथे भव्य चित्रनगरी (फिल्म सिटी) निर्माण करण्याचा निर्णय तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता.
त्यानंतर वरिष्ठ अधिकारी कामालाही लागले होते. त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क करत जागेची माहिती मागवली. त्यानंतर लगेच प्रशासनही मिशन मोडवर आले. जागेसाठी शोधमोहीम सुरू झाली. फिल्म सिटीच्या संचालक मंडळास प्रशासनाकडून मौदा, कळमेश्वर व रामटेक तालुक्यातील जागा दाखविण्यात आली होती. या तीनही जागांची विस्तृत माहिती संचालक मंडळाकडे देण्यात आली.
त्यानंतर रामटेक तालुक्यातील शिरपूर व नवरगाव या दोन गावांना पसंती दाखविण्यात आली. या दोन्ही ठिकाणी १०० एकर जागा आहे. मात्र नवरगाववर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी नवरगाव परिसरात सर्व्हे क्रमांक ७९/१ व क्षेत्र ५१.३४ हे. (१२८.३५ एकर) इतकी जागा निश्चित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. फिल्म सिटी सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे. त्यामुळे याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर
संपूर्ण रामटेक हा परिसरच नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. नवरगाव हे रामटेक शहरापासून तुमसर रोडवर ५-६ किमीच्या अंतरावर आहे. जवळच खिंडसी तलाव आहे. समोर जंगलाचे विस्तीर्ण क्षेत्र असून निसर्ग सौंदर्य आहे. त्यामुळे या जागेची निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते.
"अनेक दिवसांपासून विदर्भात चित्रपटनगरी उभारण्याचे स्वप्न होते. ते आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. चित्रनगरीमुळे रामटेकच्या पर्यटन क्षेत्राला आणखी चालना मिळेल. रामटेकचे नाव चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नावारूपाला येईल. स्थानिक कलावंतांना बेरोजगार युवक-युवतींना कामाची संधी मिळेल."
- आशिष जयस्वाल, आमदार