तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नागपूरकरांच्या सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 20:46 IST2020-08-26T20:45:52+5:302020-08-26T20:46:15+5:30
बुधवारी संध्याकाळी मुंढे यांच्या बदलीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तात्काळ सोशल मिडियावर नागरिकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नागपूरकरांच्या सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया..
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बुधवारी आलेल्या बदलीच्या आदेशाने त्यांच्या चाहत्या वर्गाला धक्का बसला आहे. मुंढे नागपुरात जानेवारी महिन्याच्या २८ तारखेला रुजू झाले होते. अवघ्या आठच महिन्यात त्यांची बदली मुंबईला करण्यात आली आहे. त्यांची ही आठ महिन्यांची कारकीर्द एका अर्थाने वादळी राहिली आहे.
बुधवारी संध्याकाळी मुंढे यांच्या बदलीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तात्काळ सोशल मिडियावर नागरिकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यातल्या सर्वच प्रतिक्रिया नाराजीच्या व निषेधाच्या आहेत. राजकारण लोकांना नको आहे, काम हवे आहे असाही एक स्वर उमटतो आहे. त्यांची बदली व्हायला नको होती इथपासून त्यांच्यामुळे नागपुरातील कोरोना कंट्रोलमध्ये होता, आता इथे कोरोनाचा स्फोट निश्चित आहे इथपर्यंतच्या तीव्र नोंदी उमटल्या आहेत. आता नागपुरातून कोरोना हद्दपार होईल अशा व्यंगात्मक टीकेपर्यंतही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्यांची बदली रद्द करा; सत्य हरले; त्यांची गरज आहे नागपूरला; त्यांची बदली ही नागपूरच्या दृष्टीने अत्यंत वाईट बातमी; त्याचा निषेध; खूप दु:ख झाले; नागपूरकर जागे व्हा, मुंढे यांची बदली रोखा;.. राजकारण जिंकले; बेईमान लोकांचा जमाना आहे.. काम करणारा माणूस नको असतो.. ; ही बदली नागपूरसाठी कलंक आहे.. अशा प्रकारच्या निषेधात्मक प्रतिक्रिया आहेत.