नागपूरच्या तरुणाने अमेरिकेत जिंकली एअराेडिझाईन स्पर्धा
By निशांत वानखेडे | Updated: April 17, 2025 18:53 IST2025-04-17T18:52:20+5:302025-04-17T18:53:19+5:30
महेश्वर ढाेणेचे काैशल्य : ६० देशांच्या चमूंना मागे टाकले

Nagpur youth wins aero design competition in America
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काैशल्य असले की कर्तृत्व एक दिवस उजळून निघते. विदर्भाच्या तरुणांमध्ये काैशल्य नाही, या टीकेला नागपूरच्या महेश्वर ढाेणे या तरुणाने ताकदीने उत्तर दिले. या पठ्ठ्याने थेट अमेरिकेत त्याची कर्तबगारी दाखवली. लाॅस एंजेलिस येथे झालेल्या एअराेडिझाईनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महेश्वर नेतृत्व करीत असलेल्या टीमने वायु उड्डानाचा उत्कृष्ठ नमुना दाखवला व ६० देशांच्या टीमला मागे टाकत स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला.
अमेरिकेतील सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स यांच्याद्वारे लाॅस एंजेलिस येथे नुकतीच ही स्पर्धा घेण्यात आली. यात विविध देशातील ६० चमू सहभागी झाल्या हाेत्या. यात भारताकडून महेश्वरची ‘माॅव्हरीक इंडिया’ या टीमने यात सहभाग घेतला हाेता. या टीममध्ये १० सदस्य हाेते. महेश्वर हा या टीमचा प्रकल्प संचालक, पायलट आणि मुख्य उड्डाण निरीक्षक आहे. त्याच्या संकल्पनेतून विमानाचे डिझाईन तयार करण्यात आले. ही स्पर्धा डिझाईन, पे लोड कॅपॅसिटी आणि फ्लाईंग एरो परफॉर्मन्सवर आधारित होती. महेश्वरच्या विमानाचे वजन पे-लाेडसह १८ किलाेच्यावर हाेते. महेश्वरने रिमाेट कंट्राेलच्या मदतीने या भारी वजनाचे विमान असे उडविले की पाहणाऱ्यांना भुरळ पडली. या पे-लाेडसह विमानाचे माॅडेल उडविणे कठीण असते, पण या टीमने अनेक दिवस प्रॅक्टीस करीत आणि काैशल्य पणाला लावत ते करून दाखविले. महेश्वरने हवेत वेगवेगळे काैशल्य दाखवित, गिरक्या घेत विमान उडविले, ज्यामुळे परीक्षकांचीही मने जिंकली.
राष्ट्रीय स्पर्धेत पहिला क्रमांक
विशेष म्हणजे यापूर्वी २०२३ साली चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय साईज ड्राेन डेव्हलपमेंट चॅलेंज स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला हाेता. यामध्ये देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ८१ चमू सहभागी झाल्या हाेत्या, हे विशेष.
बालपणापासूनच एअराे डिझाईनची आवड
महेश्वर सुनील ढाेणे हा सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. महेश्वरला बालपणापासूनच विमानाचे डिझाईन बनविण्याची आवड आहे. त्याने आतापर्यंत सीड ड्राॅपिंग, थ्रीडी, फायटर जेट, डेल्टा, ग्लायडर, वाॅक अलाॅंग ग्लायडर, रबर पाॅवर अशी अनेक प्रकारची विमान माॅडेल तयार केली आहेत. यापुढे सखाेल अभ्यास करून सर्व विमाने भारतात बनावे, हे महेश्वरचे स्वप्न आहे.