ठळक मुद्दे‘इनोव्हेशन पर्व’चे शानदार उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकार ज्या काही योजना राबविते त्या म्हणजे इनोव्हेशनचाच भाग आहेत. नाविन्यपूर्ण योजनांसाठी आपल्याकडे १८ कोटींचा निधी उपलब्ध आहे. इनोव्हेशन पर्वच्या माध्यमातून आलेल्या उत्तम संकल्पनांसाठी उपलब्ध निधीचा वापर करून शहराच्या विकास होईल. तरुणांनी केलेल्या ‘इनोव्हेशन’ च्या माध्यमातून नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविले जाऊ शकते. त्यासाठी तरुणांनी नवीन संकल्पना मांडाव्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 


महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून नागपूर महापालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर इन्डोअर स्टेडियम येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, ओबीसी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, आमदार सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांची उपस्थिती होती. विविध शाळा महाविद्यालयातील १५ हजाराच्यावर विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. 

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, यापूर्वी झालेल्या हॅकॉथॉनमध्ये आलेल्या ४०० प्रकल्पांपैकी ९० टक्के प्रकल्पांचा उपयोग राज्य शासनामार्फत विविध विकासकामांमध्ये करण्यात येईल. 

सरकार भक्कमपणे युवा संशोधकांच्या पाठीशी आहे. मात्र, युवा संशोधकांनाही त्याचा पाठपुरावा करावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले. इनोव्हेशन पर्वमध्ये ५०० नवसंकल्पना येतील अशी अपेक्षा असताना हजारावर युवा संशोधकांनी नोंदणी केली. हा उपक्रम आता जागतिक स्तरावर जात आहे. भविष्यात जगाच्या पाठीवर जिथे कुठे हा उपक्रम होईल, तेथे नागपूर शहराचे नाव गौरवाने घेतले जाईल, असे प्रतिपादन नंदा जिचकार यांनी केले. 

नव्या संकल्पना व्यवसायात परावर्तित करा : डॉ. परिणय फुके
डॉ. परिणय फुके यावेळी बोलताना म्हणाले, तरुणांना युवावस्थेत जागतिक स्तरावर पोहचण्याची संधी संशोधन केल्याने मिळू शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकेरबर्ग, डिलिव्हरी कंपनीचे अध्यक्ष साहिल वर्मा यांनी आपल्या संकल्पनेतून अद्वितीय व्यवसाय उभारला. आपणही अशा संकल्पना व्यवसायाच्या रूपात परावर्तित कराव्या, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांचे मार्गदर्शन, तरुणांसोबत संवाद
उद्घाटन सोहळ्यानंतर दिवसभर चाललेल्या सत्रांमध्ये उपस्थित तरुणाईला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन करीत संवाद साधला. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. पी.एम. पडोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुकुंद पात्रीकर आणि हृषिकेश लांडगे यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हॅकथॉनचे अनुभव मांडले.
‘टीव्ही शो’ येणार
लोकसहभाग वाढविण्यासाठी मेट्रो नागरिकांच्या सोयीसाठी विविध योजना आणत आहेत. वाहतूक व्यवस्थेचे एकत्रीकरण, महाकार्ड, ग्रीन एनर्जी अशा नवनवीन संकल्पना नागपूर मेट्रो सत्यात उतरवित असून यासाठी नवनवीन संकल्पना आमंत्रित असल्याचे डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. इनोव्हेशन पर्वच्या निमित्ताने ‘देशी जुगाड-द इनोव्हेशन हाऊस’ हा एक टीव्ही शो भविष्यात येणार असून त्याच्या पहिल्या पोस्टरचे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. प्रशांत कडू यांनी प्रास्ताविककेले तर सनी फ्रान्सिस यांनी संचालन केले.

मेट्रोचे कोचेस नागपुरात तयार होणार - ब्रिजेश दीक्षित
 महामेट्रो फक्त मेट्रो रेल प्रकल्पाचे निर्माण करत नसून मेट्रोचे डबे देखील नागपुरात तयार होतील अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. महापालिकेच्या इनोव्हेशन पर्व या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
 डॉ. दीक्षित यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शहराचे बदलते रूप आणि त्याचे भविष्यातील होणारे फायदे सांगतांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात मेट्रो परिवहन सेवा आम्ही घडवत आहे याशिवाय मेट्रो स्थानकांवर कार चार्जिंग सिस्टीम लावण्यासारखे पर्यावरण संरक्षण आणि रोजगारास संधी निर्माण करण्यासाठी नवनव्या संकल्पना आणि नव्या उद्योजकांना देखील संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस ्सल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर मेट्रोने नेहमी ‘इनोव्हेशन आणि एक्सलेंस’ला चालना दिली आहे. नागपूर मेट्रोचे नाविन्यपूर्ण कार्य हे केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श ठरत आहे. अर्थपुरवठा करणाऱ्या जर्मनी आणि फ्रान्स सुद्धा नागपूर मेट्रोकडे ‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून ‘मॉडेल’ म्हणून बघतात. लोकसहभाग वाढविण्यासाठी मेट्रो नागरिकांच्या सोयीसाठी विविध योजना आणत आहेत. वाहतूक व्यवस्थेचे एकत्रिकरण, महाकार्ड, ग्रीन एनर्जी अशा नवनवीन संकल्पना नागपूर मेट्रो सत्यात उतरवित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महा मेट्रोचे कार्यस्थळ शेअरिंगची संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडली याअंतर्गत शेअरिंग पद्धती ही कामाच्या नियोजित वेळेप्रमाणे कार्यालयाचे वापर करू शकतील.

Web Title: Nagpur will get global shape due to youth innovation: Guardian Minister Bawanakule's testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.