नागपूर निर्यातक हब बनणार:रमेश बोरीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:28 IST2019-03-21T00:24:35+5:302019-03-21T00:28:08+5:30
भारत सरकारतर्फे निर्यातदारांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा निर्यातदारांना होत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे भविष्यात निर्यातक हब बनणार असल्याचे प्रतिपादन डीजीएफटी नागपूरचे सहायक संचालक रमेश बोरीकर यांनी येथे केले.

नागपूर निर्यातक हब बनणार:रमेश बोरीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत सरकारतर्फे निर्यातदारांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा निर्यातदारांना होत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे भविष्यात निर्यातक हब बनणार असल्याचे प्रतिपादन डीजीएफटी नागपूरचे सहायक संचालक रमेश बोरीकर यांनी येथे केले.
नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी), भारत सरकारचा उपक्रम ईसीजीसी लिमिटेड आणि डीजीएफटीच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदारांसाठी ‘निर्यात व्यवहारात जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन चेंबरच्या सिव्हिल लाईन्स येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी ईसीजीसी नागपूरचे शाखा व्यवस्थापक राजेश देशुरकर, सहायक व्यवस्थापक नितीन वैद्य आणि चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बोरीकर यांनी आयईसी नोंदणी, एमआयईएस अॅडव्हांस लायसन्स आदींसह भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आणि बाजारपेठेतील अनुभव सांगितले. व्यापाऱ्यांची व्यवसाय वाढीची नेहमीच इच्छा असते. पण त्यासाठी त्यांना काही जोखीमही घ्यावा लागतात. निर्यातदार व्यवसायाचा विस्तार नव्या क्षेत्रात करतो तेव्हा त्याला राजकीय, विदेशी चलन, वित्तीय जोखीम आदींचा सामना करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता असते तेव्हा निर्यातदारांना जास्त जोखीम उचलावी लागते. त्यांनी निर्यातदारांच्या शंकांचे समाधान केले.
प्रास्तविकेत हेमंत गांधी म्हणाले, विदर्भ क्षेत्रात व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी चेंबर मदत करण्यास कटिबद्ध आहे. चेंबरने नेहमीच विदर्भ आणि लगतच्या राज्यांमध्ये निर्यातदारांना आयात-निर्यात संदर्भात येणाºया अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी चेंबरचे सचिव संजय के. अग्रवाल, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, फारुक अकबानी, सहसचिव रामअवतार तोतला, स्वप्निल अहिरकर, शब्बार शाकीर आणि निर्यातक मोठ्या संख्येने उपस्थित होते.