Nagpur: मेयो-मेडिकलमध्ये जलसंकट! ३६ तासांच्या 'शटडाऊन'मुळे रुग्णसेवा होणार प्रभावित!
By सुमेध वाघमार | Updated: April 6, 2026 23:25 IST2026-04-06T23:24:00+5:302026-04-06T23:25:26+5:30
ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड (ओसीडब्ल्यू) कडून घेण्यात आलेल्या ३६ तासांच्या अचानक शटडाऊनमुळे हजारो रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि निवासी डॉक्टरांचे प्रचंड हाल होणार आहेत.

Nagpur: मेयो-मेडिकलमध्ये जलसंकट! ३६ तासांच्या 'शटडाऊन'मुळे रुग्णसेवा होणार प्रभावित!
-सुमेध वाघमारे, नागपूर
विदर्भाची 'लाईफलाईन' समजल्या जाणाऱ्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयांवर भीषण पाण्याचे संकट ओढावले आहे. ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड (ओसीडब्ल्यू) कडून घेण्यात आलेल्या ३६ तासांच्या अचानक शटडाऊनमुळे हजारो रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि निवासी डॉक्टरांचे प्रचंड हाल होणार आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसत असतानाच पाण्याचा पुरवठा खंडित होणार असल्याने रुग्णसेवा देताना रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडणार आहे.
मंगळवारी (७ एप्रिल) सकाळी १० वाजेपासून ते बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय ‘ओसीडब्ल्यू’ ने घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या मोठ्या टर्शरी केअर सेंटर्सना याची पूर्वसूचना केवळ एक दिवस आधी देण्यात आली आहे.
ऐन उन्हाळ्यात रुग्णालय आणि वसतिगृहांची पाण्याची गरज वाढलेली असताना हा निर्णय घेतल्याने या दोन्ही रुग्णालय प्रशासनाला मोठ्या आव्हानाला समोर जावे लागणार आहे.
हजारो रुग्ण, नातेवाईक, विद्यार्थी अडचणीत
मेयो, मेडिकलमध्ये विदर्भासह शेजारच्या राज्यातून विविध आजाराने ग्रस्त रुग्ण उपचाराकरीता येतात. तसेच, वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे येथे एमबीबीएस, पीजी, नर्सिंग, बीपीएमटी, ओटी व पीटी असे अभ्यासक्रम सुरु आहेत.
या संस्थेतील वसतीगृहांमध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थी वास्तव्यास असतात. तसेच, रुग्णसेवेच्या दृष्टिने लॉन्ड्री व रुग्णांकरीता पाकगृह तथा विविध वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांकरीता आहार केन्द्रसुध्दा उपलब्ध असल्याने याकरीता मोठ्या प्रमाणात पाण्याची नितांत आवश्यकता असते. सलग दोन दिवस पाणीपुरवठाच होणार नसल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाइक व वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
शटडाऊनची माहिती एक दिवसांपूर्वी
‘ओसीडब्ल्यू’ने ३६ तासांची शटडाऊनची माहिती एक दिवसांपूर्वी या दोन्ही रुग्णालयाला दिली आहे. त्यामुळे आवश्यक पाण्याची पर्यायी व्यवस्था आपातकालीन परिस्थितीत करणे दोन्ही रुग्णालय प्रशासनासाठी कठीण झाले आहे. ‘ओसीडब्ल्यू’ला या दोन्ही रुग्णालयासाठी पर्यायी काय व्यवस्था केलीे, याबाबत विचारणा केल्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
मेयोने दिली २५ टँकर्सची ऑर्डर
मेयोच वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून तातडीने २५ टँकर्सची ऑर्डर देण्यात आली आहे. गरज पडल्यास बुधवारी आणखी टँकर्स मागवले जातील.
स्वतंत्र पाईप लाईनची मागणी
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ‘ओसीडब्ल्यू’ला ला पत्र लिहून वारंवार होणाºया या त्रासातून सुटका करण्यासाठी मेडिकलला स्वतंत्र पाण्याची लाईन देण्यात यावी, अशा मागणी केली आहे.