नागपुरातील दंगलीत अल्पवयीन आरोपींचादेखील समावेश; महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग
By योगेश पांडे | Updated: March 19, 2025 20:27 IST2025-03-19T20:26:41+5:302025-03-19T20:27:04+5:30
महालात पोहोचले पारडी,जाफरनगर, बंगाली पंजा, गोरेवाड्यातील आरोपींचा समावेश : ५७ कलमांअंतर्गत गुन्हे दाखल, पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे स्पष्ट

नागपुरातील दंगलीत अल्पवयीन आरोपींचादेखील समावेश; महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग
योगेश पांडे
नागपूर : सोमवारी रात्री महाल व हंसापुरीमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटना व दंग्यांमध्ये बाहेरील तत्त्व सहभागी असल्याच्या चर्चांनी जोर पकडला होता. मात्र, प्रत्यक्षात सर्वच आरोपी हे नागपुरातील असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. परंतु सर्व आरोपी महालातील नव्हते. चिटणीस पार्क परिसरात झालेल्या दंगलीत पारडी, जाफरनगर, बंगाली पंजा, गोरेवाडा, पारडी येथूनदेखील समाजकंटक पोहोचले होते. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचादेखील समावेश होता. तसेच आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करत पोलिसांवर पेट्रोल बॉम्बदेखील फेकल्याची बाब समोर आली आहे. आरोपींविरोधात एकूण ५७ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी सायंकाळी एक गट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्रित आला व तेथे अनेकांच्या हाती शस्त्रे होती. धार्मिक घोषणा देत शिवीगाळ करण्यात येत होती. घटनास्थळ महाल असले तरी तेथे शहराच्या विविध भागांतून समाजकंटक पोहोचले होते. सीसीटीव्ही फुटेज व सोशल माध्यमांवरील व्हिडीओजच्या माध्यमातून अनेकांची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी यासी शेख मोहम्मद शरीफ, शेख फयाज शेख फिरोज, शेख अहफाज शेख फिरोज, मो.अल्ताफ मो.युसूफ, मो.जुमान रजाक, अब्दुल अमन पठाण, मो.इक्बाल ईस्माईल अन्सारी, मो.इजाद मो.इस्माईल, मो.अक्सार मो.ईस्माईल, मो.इजहार मो.ईस्माईल, शेख आबीद शेख नासीर, फैजान समीन शेख, अदनान समीन शेख, इमानुद्दीन शेख, अशफाक खान, काशीफ खान बशीर खान, इरफान अहमद कुरेशी, अल्ताफ मो.अनिस, वसीम रजा खान, नदीम खान रफीक खान, अब्दुल मैफुज अब्दुल वाहीद, मो.शेख हसन शेख, शेख अक्रम शेख अख्तर, अमीर रजा खान, अदनान अली युसूफ अली, शेख रियाज अब्दुल रशीद, दानिश खान, मो.अयाज मो.अयुब, शेख असरार शेख असलम, फैजन अमीन अन्सारी, मो.इम्रान मुजीब अशरफ, मो.अन्सारी, नसरुद्दीन शेख, अब्दुल अदनान अब्दुल वहीद, इबादुल्ला खान, वसीम शेख, शेख इम्रान शेख मुख्तार, मो.आवेज अन्सारी, सैफ अली खान, शेख नादीम शेख सलीम, मो.शाहनवाज, मो.हरीस उर्फ मो.ईस्माईल, युसुफ शेख उर्फ अब्दुल हफीज, शेख सादीक शेख नबी, मो.युसुफ यांच्यासोबत शेकडो आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग
दरम्यान, भालदारपुरा चौकाजवळ कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावाकडून विनयभंग करण्यात आला. पोलिसांना जमावाने घेरले व मारहाण केली. त्यादरम्यान, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा शरीराला स्पर्श करत वर्दीवर हात टाकला. इतर महिला कर्मचाऱ्यांनादेखील अश्लिल शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्याकडे पाहून अश्लिल शेरेबाजी करत घाणेरडे इशारेदेखील केले.
असा घटना घटनाक्रम
- छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमाव एकत्रित आला
- जमावातील काही जणांकडून चिथावणी, पोलिसांना शिवीगाळ
- भालदारपुरा व चिटणीस पार्क चौकात पोलिसांवर दगडफेक व हल्ला
- पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकून जीव घेण्याचा प्रयत्न
- महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात टाकण्याचा प्रयत्न
- पोलिसांच्या वाहनांची तोडफोड
- गितांजली चौकात पोलिसांना घेरून दगडफेक
- तेथील पोलीस बुथ, तसेच मोबाईल वाहने जाळली
- पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने शासकीय वाहने जाळली
- चिटणीस पार्क ते नातिक चौकादरम्यान घरे जाळण्याचा प्रयत्न