नागपूर - औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाला नागपूरात हिंसक वळण लागलं. हा हल्ला पूर्वनियोजित असून पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या हिंसाचारात ३३ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यात ३ डीसीपी स्तरावरील अधिकारी आहेत. या घटनेत १२ दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. नागपूरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबरीविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर पसरलेल्या एका अफवेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
नागपूरातील महाल परिसरात काही वाहने जाळण्यात आली. दगडफेक झाली. जवळपास ८० ते १०० जणांचा जमाव जमला होता. या घटनेत टोळक्यांनी एक क्रेन, २ जेसीबी वाहनांसह काही खासगी वाहनेही जाळली. त्याशिवाय काही लोकांवर तलवारीनेही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. त्यात ३३ पोलीस जखमी झाले. ५ सामान्य लोकांनाही इजा झाली. एका डीसीपी अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला.
५ एफआयआर नोंद
नागपूर हिंसाचार प्रकरणी ५ विविध एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्थेची स्थिती पाहता ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लागू केला आहे. एसआरपीएफच्या ५ तुकड्या शहरात तैनात आहेत. राज्यातील जनतेने शांतता पाळावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या घटनेतील दोषींना सोडणार नाही असा इशाराही सरकारने दिला आहे. आतापर्यंत या घटनेतील ५० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ यामाध्यमातून अन्य आरोपींची ओळख पटवली जात आहे.
दरम्यान, नागपूरात झालेल्या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीही जखमी झाले. आग विझवण्यासाठी दाखल झालेल्या जवानांवरही दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलक दगड, चाकू फेकून मारत असल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत पोलीस आयुक्तदेखील काही प्रमाणात जखमी झाले. या घटनेत डीसीपी निकेतन कदम यांच्यावर काही आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.