Nagpur Violence: नागपूर येथे झालेल्या २ गटातील तणावाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. विरोधकांनी या प्रकाराला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना निंदनीय आहेत. सगळ्यांनी एकत्रित राहिले पाहिजे. आपण संविधानाला मानणारे लोक आहोत. मुख्यमंत्र्यांचं शहर जळत असेल तर त्याला काय अर्थ नाही. क्षुल्लक कारणावरून एकमेकांना भडकवणं थांबवले पाहिजे. महाराष्ट्र जपा असं सांगत काँग्रेस महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
'त्या' मंत्र्याची हकालपट्टी करा
नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळं मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
बाहेरून लोक आणून प्लॅनिंगनं घडवला प्रकार
सकाळी परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र काही बाहेरचे लोक आणून दगडफेक, जाळपोळ केली. दंगलखोरांना पोलीस पकडत आहेत. बाहेरून लोक आणून काहींनी नियोजनपद्धतीने हा प्रकार घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप भाजपा आमदार प्रवीण दटके यांनी केला.
दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ज्या लोकांनी ही दगडफेक केली त्यांना ताब्यात घेत आहोत. आतापर्यंत १०-१५ लोकांना ताब्यात घेतले आहे. ज्या लोकांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतला त्यांना ताब्यात घेतले जात आहे. कुठल्याही अफवेला बळी पडू नका. आम्ही रस्त्यावर आहोत. सर्व नियंत्रणात आणत आहोत असं आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी लोकांना केले आहे.