Nagpur Voilence: नागपूर पोलिसांना मंत्री बावनकुळेंकडून शाबासकी, आमदार दटकेंची मात्र नाराजी
By योगेश पांडे | Updated: March 18, 2025 20:15 IST2025-03-18T20:14:54+5:302025-03-18T20:15:24+5:30
घटना झाल्यावर पोलिसांनी वेगाने शांतता प्रस्थापित केली व ते जास्त महत्त्वाचे होते, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

Nagpur Voilence: नागपूर पोलिसांना मंत्री बावनकुळेंकडून शाबासकी, आमदार दटकेंची मात्र नाराजी
योगेश पांडे
नागपूर : सोमवारी रात्री महाल, हंसापुरीत झालेल्या दोन गटांमधील संघर्ष, जाळपोळ यावरून राजकीय प्रतिक्रियादेखील सुरू झाल्या. राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबाबत नागपूरपोलिसांची पाठ थोपटली आहे. मात्र, दुसरीकडे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: त्यांनी तहसील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर समाधान व्यक्त केले. पोलिसांची एकूण स्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे. दोन गटातील संघर्ष नियंत्रणात आणणे जास्त महत्त्वाचे होते. तणावपूर्ण परिस्थिती असताना ते ढाल बनून उभे राहिले. अशा स्थितीत पोलिसांसोबत समाजाने उभे राहणे आवश्यक आहे, असे बावनकुळे म्हणाले. या एकूण प्रकरणात गृहमंत्रालयाचे व पोलिसांचे कुठलेही अपयश नाही. घटना झाल्यावर पोलिसांनी वेगाने शांतता प्रस्थापित केली व ते जास्त महत्त्वाचे होते, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.
काय म्हणाले प्रवीण दटके?
दरम्यान, आ. प्रवीण दटके यांनी मात्र पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. शहरात कुठेही तणाव झाला तरी मध्य नागपुरातील काही भागात अगोदर पोलिस बंदोबस्त लावण्यात येतो. मात्र, सोमवारी पोलिस बंदोबस्त वेळेवर लावण्यात आला नाही. हंसापुरीत अगोदरच पोलिस बंदोबस्त लावला असता तर तेथे जमावाने हल्ला करण्याची हिंमत केली नव्हती. घटना झाल्यावर पोलिस पोहोचले, मात्र तोपर्यंत नुकसान झाले होते, असा नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांनी पोलिस ठाण्यात फोन लावल्यावर त्यांना वेळेवर मदत का मिळाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिस निरीक्षक संजय सिंग यांनी संवेदनशीलता दाखविली नाही, अशी नागरिकांची भूमिका आहे. जर यात सत्य असेल तर त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी मी करेन, असे दटके यांनी सांगितले.