Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन उघड; 'ते' फेसबुक पेज...
By योगेश पांडे | Updated: March 19, 2025 23:28 IST2025-03-19T23:28:03+5:302025-03-19T23:28:54+5:30
चिथावणीखोर फेसबुक खाते तेथून होत होते नियंत्रित : पोलिसांसोबतच गुप्तचर यंत्रणादेखील सतर्क, या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली.

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन उघड; 'ते' फेसबुक पेज...
योगेश पांडे
नागपूर : नागपुरच्या दंगलींच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे. या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणीदरम्यान पोलिसांनाबांगलादेशशी कनेक्शन आढळून आले. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिस आणि गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या दिशेने तपासही सुरू केला आहे.
सोमवारचा हिंसाचार पसरवण्यात सोशल मीडियाची मोठी भूमिका होती. त्याच्या माध्यमातून उन्माद पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. शहर पोलिसांची सायबर टीम सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे व विविध सोशल मीडिया खात्यांची सखोल तपासणी करण्यात आली. बुधवारी प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांविरोधात चार गुन्हे दाखल झाले. एका फेसबुक अकाउंटवरून एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली. या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली. यामुळे पोलीसदेखील हादरले. यानंतर गुप्तचर संस्थाही सतर्क झाल्या आहेत व सखोल चौकशी सुरू झाली आहे. या घडामोडीला सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दुजोरा दिला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
नागपुरात अनेक बेकायदेशीर बांगलादेशी
नागपुरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहतात. मध्य आणि उत्तर नागपूरच्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात मोठ्या संख्येने त्यांचा निवास आहे. अशा परिस्थितीत नागपूरमध्ये पसरलेल्या हिंसाचारात बांगलादेशचा संबंध असण्याची शक्यता असल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.