लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानमध्ये हाहाकार माजविणाऱ्या आणि उभ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये नागपूरविदर्भांने अत्यंत गाैरवास्पद भूमिका बजावल्याची माहिती आहे. नागपूर, विदर्भानेच शक्तिशाली स्फोटकांच्या रूपात थेट पाकिस्तानमध्ये शिरून कायम लक्षात राहिल, असा धडा पाकिस्तानला शिकवला आहे. नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला ही महत्वपूर्ण माहिती शीर्षस्थ सूत्रांनी दिली आहे.
उल्लेखनीय असे की, भारतीय लष्कराची खरी ताकद नागपूर-विदर्भात आहे. नागपूर आणि भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. तर वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे केंद्रीय दारूगोळा भांडार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा असलेल्या वर्धेच्या या भांडारात अतिशक्तिशाली दारुगोळा साठवला जातो. भंडाऱ्यात अतिउच्च क्षमतेची स्फोटके तयार केली जातात. तर नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीमध्ये लष्करासाठी विध्वंसक स्फोटके, ड्रोन, मिसाईल, रॉकेट लांचरची रसद तयार केली जाते. अर्थात शत्रू देशांची दाणादाण उडवणाऱ्या भारतीय लष्कराला नागपूर-विदर्भातील अतिशक्तिशाली दारुगोळ्याची नियमित भक्कम साथ असते.
वारंवार कुरापती करून भारतीयांना २६/ ११, पुलवामा, पहलगाम सारख्या अनेकदा जीवघेण्या जखमा देणाऱ्या पाकिस्तानला भारताने मंगळवारी-बुधवारच्या पहाटे धडा शिकवला. भारताला संपवण्याची वल्गना करणाऱ्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना 'घर मे घूंस के मारना' काय असते, त्याचीही प्रचिती दिली. दहशतवादी संघटनांशी संबंधित असणाऱ्यांच्या सात पिढ्यांना धडकी भरविणाऱ्या या एयर स्ट्राइक मध्ये लष्कराकडून नागपूर विदर्भातील दारूगोळा मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
भारतीय शक्तीचा परिचय
सोलर इंडस्ट्रीजने तयार केलेल्या SEBEX 2 स्फोटकांनी भारतीय शस्त्रागारात क्रांती घडवून आणली आहे. या स्फोटकांचे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे. भारतीय लष्करी सामर्थ्याची आणि विध्वंसक शक्तीची शत्रूंना ओळख करून देण्यासाठी ही स्फोटके जगभरात नावारूपाला आली आहे.
मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधितउभ्या जगासमोर पाकिस्तानवर नामुष्कीची वेळ आणणाऱ्या या एअर स्ट्राईकची रसद नागपूर-विदर्भातून गेल्याची चर्चा आहे. या संबंधाने अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी 'सोलर' प्रशासनाशी 'लोकमत प्रतिनिधीने' वारंवार संपर्क केला. मात्र, मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.