नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा उद्या निकाल; २२.९७ टक्के मतदान
By आनंद डेकाटे | Updated: March 20, 2023 18:24 IST2023-03-20T18:21:32+5:302023-03-20T18:24:58+5:30
मंगळवारी सकाळी मतमोजणी

नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा उद्या निकाल; २२.९७ टक्के मतदान
नागपूर : तब्बल सहा वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदार संघाची निवडणूक रविवारी पार पडली. केवळ २२.९७ टक्के इतकेच मतदान झाले. मंगळवारी नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होईल. यंदा कमी मतदान झाले असल्याने निकालाला फार उशीर लागणार नाही, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. परंतु आजवरचा इतिहास पाहता सिनेट निवडणुकीचे निकाल लागण्यास प्रचंड उशीर होत असतो.
नागपूर विद्यापीठ सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके कमी मतदान झाले. मागील निवडणुकीत ३५ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची वाढलेली संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. निवडणुकीबाबत पदवीधर मतदारांमध्ये सकाळपासूनच फारसा उत्साह दिसून आला नाही. नागपूर विद्यपीठ क्षेत्रातील जिल्हानिहाय विचार केला तर वर्धेत सर्वाधिक २६.११ टक्के इतके मतदान झाले. सर्वात कमी मतदान भंडारा येथे २०.५१ टक्के इतके झाले. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल.
- असे झाले जिल्हानिहाय मतदान
नागपूर शहर : २३.१४ टक्के
नागपूर ग्रामीण : २५.६५ टक्के
भंडारा : २०.५१ टक्के
गोंदिया : २१.५३ टक्के
वर्धा : २६.११ टक्के