नागपुरात बेलगाम कारने अल्पवयीनास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:27 IST2020-11-09T23:25:38+5:302020-11-09T23:27:14+5:30
Uncontrolled car crushed a minor मामासोबत जात असलेल्या बालकास बेलगाम कारने चिरडले. ही घटना रविवारी रात्री सक्करदरांतर्गत बहादुरा येथील आहे.

नागपुरात बेलगाम कारने अल्पवयीनास चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मामासोबत जात असलेल्या बालकास बेलगाम कारने चिरडले. ही घटना रविवारी रात्री सक्करदरांतर्गत बहादुरा येथील आहे. मृताचे नाव रितेश श्रीकृष्ण पलांदुरे (१५) रा. बहादुरा, माँ शारदानगर असे आहे.
रितेश नवव्या वर्गातील विद्यार्थी आहे. सोमवारी क्वॉर्टर निवासी रितेश चौरे मृत रितेश पलांदुरेच्या आईचा मानलेला भाऊ आहे. रविवारी सुटी असल्याने चौरे रितेशच्या नातेवाईकांना भेटण्यास बहादुरा येथे आला होता. चौरेला त्याच्या एका मित्राने आपल्या बाईकने बहादुऱ्याजवळ सोडले होते. चौरेने त्याच्या मानलेल्या बहिणीला फोन करून कुणाला तरी पाठविण्यास सांगितले. बहिणीने मुलगा रितेशला बाईक घेऊन चौरेला आणण्यास पाठवले. रितेश आल्यावर चौरे बाईक चालवून जायला लागला. दरम्यान लघुशंकेसाठी ते थांबले. तेव्हा रितेश बाईकवरच बसला होता. अचानक संतुलन बिघडल्याने रितेश बाईकसह पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या कार क्रमांक एमएच/४६/एल/४५५ ने त्याला चिरडले. त्यात रितेश गंभीर जखमी झाला. कार चालक व चौरे यांनी रितेशला हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी कार चालकाविरोधात अपघाताचे प्रकरण नोंदवले आहे.