उपराजधानीत चोवीस तासात दोघांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:20 IST2018-03-10T00:04:21+5:302018-03-10T00:20:02+5:30
गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.

उपराजधानीत चोवीस तासात दोघांची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.
रुबिना सलीम खान (रा. मोहननगर, सदर) ही महिला मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या उड्डाण पुलाखाली ( प्रवेशद्वारासमोर) हातठेल्यावर फळ विकत होती. शुक्रवारू रात्री ८.४५ च्या सुमारास रुबिना मृतावस्थेत दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. रुबिनाच्या डोक्यावर आणि गळ्यावर घाव होता. चौकशीत तिची दोन ते तीन जणांनी हत्या केल्याचा संशय आजूबाजूच्यांनी व्यक्त केला. एका संशयिताचे नावही पोलिसांना कळले. त्यावरून पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात वेगवेगळळ्या भागात रवाना झाली. दरम्यान, पोलिसांनी रुबिनाचा मृतदेह रुग्णालयात पाठविला. हत्येच्या या घटनेने रेल्वेस्थानक परिसरात दहशत निर्माण झाली होती.
यशोधरानगरातील मृताचे नाव शेरू अली मोहम्मद अली (वय ४०) असून, तो एकता कॉलनी गौसीया मस्जीदजवळ सुकेशिनी राजेश बल्लारे (वय ३५) हिच्या घरी राहायचा. तो गांजा विकत होता. त्याच्याकडे ओरिसा, आंध्रप्रदेशमधील तस्कर नेहमी गांजाची खेप घेऊन येत होते. नेहमीप्रमाणे राजलक्ष्मी नामक महिला गुरुवारी गांजाची खेप घेऊन शेरू-सुकेशिनीच्या घरी आली. तिने घरात पिशवी ठेवली होती. त्याचवेळी तेथे जरीपटक्यातील लुंबिनीनगरात राहणारा आरोपी गोलू ऊर्फ विद्याधर कांबळे आला. तो निघून गेल्यानंतर राजलक्ष्मीच्या पिशवीतील तीन गांजाची पाकिटं गायब झाल्याचे शेरूच्या लक्षात आले. ते कांबळेनेच चोरले असावे, असा संशय आल्याने शेरूने कांबळेला बोलविले. कांबळे त्याच्या दोन साथीदारासह गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास शेरूच्या घरी पोहचला. यावेळी चोरलेला गांजा परत आणून दे, असे म्हणत शेरूने कांबळेसोबत वाद घातला. कांबळेने नकार देताच शेरूने त्याला दोन थापडा मारल्या. यामुळे कांबळेने त्याच्यावर लोखंडी पाईपने हल्ला चढवला. त्याला रक्तबंबाळ केल्यानंतर कांबळेसोबत असलेले त्याचे साथीदार कुणाल नरेंद्र वाघमारे (वय २०, रा. लुंबिनीनगर) आणि दाद्या ऊर्फ राहुल भीमराव इंगळे (वय २४) या दोघांनी शेरूला पकडले तर कांबळेने धारदार खंजराने शेरूवर सपासप घाव घालून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी सुकेशिनी बल्लारेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली.
पळून जाण्याची होती तयारी
शेरूची हत्या केल्यानंतर आरोपी कांबळे, वाघमारे आणि इंगळे यशोधरानगरातून पळून गेले. हे तिघेही गुन्हेगारी वृत्तीचे असून, यशोधरानगर तसेच जरीपटक्यात ते अवैध दारू, गांजाची विक्री करतात. त्यांनी पैशाची जुळवाजुळव केल्यानंतर पहाटे नागपुरातून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, ठाणेदार पुंडलिक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यानी या तिघांच्याही मुसक्या बांधल्या.