वस्तूंचे नागपूर निर्यातकेंद्र बनावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:45+5:302021-02-05T04:53:45+5:30
नितीन गडकरी: गठई कामगारांना स्टॉलकरिता अस्थायी जागांचे परवाने वाटप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चर्मकार समाजबांधव जसे जोडे-चपला बनवितात ...

वस्तूंचे नागपूर निर्यातकेंद्र बनावे
नितीन गडकरी: गठई कामगारांना स्टॉलकरिता अस्थायी जागांचे परवाने वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चर्मकार समाजबांधव जसे जोडे-चपला बनवितात तसेच विविध समाजाचे निरनिराळे उद्योग आहेत. या पारंपरिक उद्योगांना आता आधुनिकतेची जोड द्यावी. उत्तम वस्तू निर्मितीचे नागपूर केंद्र बनावे आणि येथून जगात सर्वत्र वस्तू निर्यात व्हाव्यात. शहर आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मनपातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी गठई कामगारांच्या स्टॉलकरिता ३६ कामगारांना अस्थायी जागांचे परवाना पत्र वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आमदार प्रवीण दटके, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे आदी उपस्थित होते.
नितीन गडकरी, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह सर्व मान्यवरांनी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविकातून चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भय्यासाहेब बिघाणे यांनी गठई कामगारांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे लढ्याची माहिती देत कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. संचालन उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी केले.
गठई कामगार मेहनती आहे. त्यांना आपले काम सोडून केवळ कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, यासाठी मनपातील स्थावर विभागात त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आल्याचे यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
...
पुढील टप्प्यात उर्वरित कामगारांना वाटप
सर्व गठई कामगारांना संत रविदास आश्रय योजनेंतर्गत १०० टक्के अनुदान देऊन स्टॉल बांधून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मनपाला एकूण १३३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १०६ अर्ज मंजूर करण्यात आले. या लोकांना आज अस्थायी जागांचे परवाने वाटप करण्यात आले. इतरांची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून पुढील टप्प्यात त्यांना परवाने वाटप करण्यात येणार आहेत.