नागपूर आरटीओ : फेरतपासणीपासून २०० स्कूल बस दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:26 IST2019-06-03T23:25:42+5:302019-06-03T23:26:56+5:30
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून ६ जूनपूर्वी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार आतापर्यंत साधारण ७०० स्कूल बसने फेरतपासणी करून घेतली, असून २०० स्कूल बस अद्यापही तपासणीपासून दूर आहेत.

नागपूर आरटीओ : फेरतपासणीपासून २०० स्कूल बस दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून ६ जूनपूर्वी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार आतापर्यंत साधारण ७०० स्कूल बसने फेरतपासणी करून घेतली, असून २०० स्कूल बस अद्यापही तपासणीपासून दूर आहेत.
फिटनेसचे प्रमाणपत्र असतानाही स्कूल बस ‘फिट’ राहत नसल्याच्या अनेक पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतो. यापूर्वी अनेक घटनांमधून ही बाब पुढे आली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्कूल बसेसची फिटनेस चाचणी घेण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध आहे, त्यांना सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्कूल बसेस फेरचाचणीकरिता सादर करणे बंधनकारक केले. फेर तपासणीत वाहनात दोष आढळून आल्यास दोषाचे निराकरण केल्यानंतर वाहन तपासणीसाठी पुन्हा सादर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. फेरचाचणीचा कालावधी ३ मे ते ६ जूनपर्यंत आहे. या कालावधीत आतापर्यंत ७०० स्कूल बसनी आपली तपासणी करून घेतली आहे. यातील ज्या बसेसचे फिटनेस या महिन्यात संपत आहेत त्यांनीही तपासणी केल्याची माहिती आहे. ६ जूनपर्यंत ज्या स्कूल बसने तपासणी केली नाही त्यांच्यावर आरटीओ कार्यालयाकडून कारवाई होणार आहे.
फेरतपासणीला प्रतिसाद मिळत आहे
एक महिन्याच्या कालावधीत साधारण ७०० स्कूल बसची फेरतपासणी करण्यात आली. स्कूल बसचालकांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित २०० स्कूल बसही तपासणीसाठी आरटीओ कार्यालयात येतील, अशी अपेक्षा आहे.
अतुल आदे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ शहर नागपूर