Nagpur Riots: कुठून आली शस्त्रे-पेट्रोल बॉम्ब? महालातील दंगल पुर्वनियोजितच...

By योगेश पांडे | Updated: March 19, 2025 23:54 IST2025-03-19T23:53:04+5:302025-03-19T23:54:01+5:30

विरोधी गटाच्या घरांची झाली होती ‘रेकी'

Nagpur Riots: Where did the weapons and petrol bombs come from? The riots in the Mahal were pre-planned | Nagpur Riots: कुठून आली शस्त्रे-पेट्रोल बॉम्ब? महालातील दंगल पुर्वनियोजितच...

Nagpur Riots: कुठून आली शस्त्रे-पेट्रोल बॉम्ब? महालातील दंगल पुर्वनियोजितच...

योगेश पांडे

नागपूर : सोमवारी साडेआठ ते तीन या दरम्यान महाल, भालदारपुरा, हंसापुरी या भागाने ‘न भुतो न भविष्यति’ अशी दहशत अनुभवली आणि त्यानंतर या दंगलीच्या कारणांच्या ‘पोस्टमॉर्टेम’ला सुरुवात झाली. अनेक जणांकडून वस्तुस्थितीला धरून नसणारे दावे करण्यात आले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे महाल व हंसापुरीतील जाळपोळ व दगडफेक पुर्वनियोजितच असल्याचे त्या रात्रीच्या एकूण घटना व स्थितीवरून बऱ्याच अंशी दिसून येत आहे. ‘लोकमत’ने त्या रात्री अनुभवलेली ‘आंखो देखी’ आणि पोलिसांच्या अनुभवांवरून या चार प्रमुख घटना त्याकडेच संकेत करत आहेत.


घटना एक : घरांची रेकी अन गायब झालेली वाहने
महालातील जुना हिस्लॉप कॉलेजच्या मागील भागात एका गटाचे लोक राहतात. त्याच्या टोकाशी दुसऱ्या गटाच्या वाहनांची पार्किंग केली असते तसेच एका गॅरेजमधील गाड्यादेखील रस्त्यावर लावलेल्या असतात. मात्र दंगलीच्या रात्री तेथे दुसऱ्या गटाची वाहनेच नव्हती. शिवाय पहिल्या गटाच्या घरांना नियोजनबद्ध पद्धतीने टार्गेट करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांच्या घरावर ठरवून हल्ला झाला. तसेच त्या गल्लीत पेशने व इतर जणांच्या गाड्या जाळण्यात आल्या. पेशने यांच्या गाडीला जाळल्यावर जवळपास १० ते १२ किलो वजनाचा दगड फेकण्यात आला होता. तसेच त्यांच्या खिडकीला आग लावण्यात आली. संबंधित दगड बाहेरून आणण्यात आला होता व पुर्वनियोजित कटाचाच हा प्रकार दिसून आला.


घटना दोन : पेट्रोल बॉम्बचा जागोजागी वापर
भालदारपुरा, चिटणीस पार्क चौक तसेच हंसापुरीत मोठ्या प्रमाणावर वाहनांची जाळपोळ झाली. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवरदेखील हल्ला झाला. यासाठी समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्ब वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातदेखील त्याचा उल्लेख आहे. पेट्रोल बॉम्ब सहजासहजी व लगेच तयार होऊ शकत नाही. सर्वसामान्य व्यक्ती त्याचा लगेच उपयोगदेखील करू शकत नाही. त्याची माहिती आरोपींना पद्धतशीरपणे देण्यात आल्याचे जाळपोळीवरून स्पष्ट झाले होते. आरोपींकडे अगोदरपासूनच कुऱ्हाड व इतर शस्त्रे होती. त्यातीलच एका कुऱ्हाडीने उपायुक्त निकेतन कदम यांना जखमी करण्यात आले.


घटना तीन : विशिष्ट गटाचीच वाहने-घरे टार्गेट
महाल व हंसापुरी परिसरात विशिष्ट गटाचीच वाहने व घरे टार्गेट करण्यात होती. हंसापुरीत मध्यरात्रीच्या सुमारास एकाच गल्लीतील घरांवर दगडफेक करण्यात आली तसेच तेथील वाहने जाळण्यात आली. त्या गल्लीत दुसऱ्या गटातील व्यक्तीचे दुकान होते. मात्र त्या दुकानाला आरोपींनी हातदेखील लावला नाही. त्याचप्रमाणे अनेक अल्पवयीन मुले हातात चिंध्या व बाटल्या घेऊन फिरत होते. तसेच अगदी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यांची नावे घेत तिथपर्यंत दगड फेकण्यात आले. आरोपींकडून पिडीतांच्या घरांची रेकी करण्यात आली होती व त्यांच्या बोलण्यावरून तेच तेथील लोकांना जाणवले. त्या भागात पहिल्या गटाशी निगडीत लोकांचे सेेकंड हॅंड गाड्यांची दुकाने आहेत. त्यांनादेखील नुकसान करण्यात आले नाही. विशेष म्हणजे हंसापुरीत तलवारी व शस्त्रे घेऊन आरोपी रस्त्यांवर उतरले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे आली कुठून हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.


घटना चार : वरच्या मजल्यांवर दगडधोंडे
भालदारपुऱ्यात रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. अरुंद गल्ल्यांमध्ये पोलीस गेले असता त्यांच्यावर काही घरांमधील वरच्या मजल्यांवरून अंधाराचा फायदा घेत दगडधोंडे फेकण्यात आले. यात काही पोलीस अधिकारी जखमीदेखील झाले. वरच्या मजल्यांवर दगडधोंडे अगोदरच पोहोचविण्यात आले होते हे दिसून आले.

Web Title: Nagpur Riots: Where did the weapons and petrol bombs come from? The riots in the Mahal were pre-planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.