नरेश डोंगरे, नागपूर: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) त्यांना ताब्यात घेत चाैकशी सुरू केली. दरम्यान, हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असावा, असा संशय आल्याने मुलांना बिहारमधून सोबत घेऊन येणारांची मंगळवारी पहाटेपर्यंत चाैकशी सुरू होती.
ट्रेन नंबर १८०३० शालीमार एक्सप्रेस सोमवारी रात्री नागपुरात आली. फलाट क्रमांक ८ वर तैनात असलेल्या स्टेशन मास्तरला अनेक छोटी छोटी मुले एकापाठोपाठ उतरताना दिसल्याने संशय आला. त्यांनी आरपीएफच्या जवानांना पाचारण केले. छोटी-छोटी २६ मुले एकसाथ दिसल्याने आणि त्यांचे पालक सोबत नसल्याने संशयकल्लोळ वाढला. सर्व मुले १५ वर्षांच्या आतील वयोगाटाचे आहेत. टिचर म्हणवून घेणारे दोघे त्यांचे दिशादर्शक म्हणून काम करत होते. त्यामुळे आरपीएफने त्यांना विचारपूस सुरू केली. ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असावा, असा संशय बळावल्याने लगेच बाल कल्याण समिती आणि चाईल्ड लाईनच्या सदस्यांना बोलवून घेण्यात आले.
पहाटेपर्यंत झाली शहानिशाजिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, चाईल्ड लाईनचे नीतेश सांगोडे, रणजित कुंभारे, दीपाली धमगाये यांनी आरपीएफचे निरीक्षक यादव यांच्या देखरेखित पहाटेपर्यंत विचारपूस चालली. ही सर्व मुले बांगलादेश सिमेवरील किशनगंज जिल्ह्यातील (बिहार) कलकली तसेच आजुबाजुच्या ठिकाणची असून ती येथे मदरशात शिक्षणसाठी आल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले.
आईवडिलांशी संपर्कसीडब्ल्यूसी आणि चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनी ही मुले शिक्षणासाठी नागपुरात पाठविल्याचे सांगितल्याची माहिती अधिकारी सांगतात. दरम्यान, समोरसामोर खात्री करून घेण्यासाठी मुलांच्या पालकांना नागपुरात बोलविले असून, ते बुधवारी सायंकाळपर्यंत पोहचणार आहेत. तूर्त मुलांना पाटणकर चाैकातील शासकीय बालगृहात ठेवण्यात आल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पठाण यांनी सांगितले.
मुलांना दुसऱ्या प्रांतात नेता येते ?कोणत्याही कारणासाठी अल्पवयीन मुलांना आईवडील सोबत नसताना एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नेता येते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी विधिज्ञांचे मत घेतले जात आहे. बाल संरक्षण कायद्यानुसार, मुलांना त्यांच्या पालकांशिवाय एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नेले जात असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे आरपीएफसह अन्य यंत्रणाही या प्रकाराच्या चाैकशीकडे नजर ठेवून आहेत.