नागपूरची लोकसंख्या २१ लाख, आधार नोंदणी ३० लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:53 IST2018-08-20T00:21:12+5:302018-08-20T06:53:50+5:30
आकडेवारीत घोळ; लोकसंख्येहून ‘आधार’धारक अधिक

नागपूरची लोकसंख्या २१ लाख, आधार नोंदणी ३० लाख!
- योगेश पांडे
नागपूर : लोकसंख्येहून अधिक संख्येने आधारची नोंदणी झाल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यात समोर आला आहे. नागपूर शहर वगळता जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या २१ लाख असताना ३० लाख ४५ हजार १२५ नागरिकांची ‘आधार’ नोंदणी झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार मौदा तालुक्याची लोकसंख्या १ लाख २५ हजार १७० इतकी होती. २०१५ मध्ये ती संख्या १ लाख ४० हजार १६ इतकी झाली. मात्र या तालुक्यात ११ लाख ५५ हजार ७८३ नागरिकांनी आधारची नोंदणी केली आहे. लोकसंख्येहून १० लाख १५ हजार ७६७ अधिक नागरिकांनी मौदा तालुक्यात नोंदणी कशी काय केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दाव्यात कितपत तथ्य?
२०१० पासून सुरू झालेल्या ‘आधार’ प्रकल्पाला नागपूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे. जिल्ह्यात ९८ टक्क्यांहून अधिक नागरिकांची ‘आधार’ नोंदणी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मात्र आकडेवारीचा हा घोळ लक्षात घेता या दाव्यात नेमके किती तथ्य आहे, असा प्रश्न आहे.