नागपूर पोलिसांची कामगिरी समाधानकारक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:28 IST2017-12-20T00:26:22+5:302017-12-20T00:28:01+5:30
नागपूर मधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकामी पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

नागपूर पोलिसांची कामगिरी समाधानकारक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऑनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर मधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकामी पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य सुनील केदार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर पोलीस कार्यक्षम आहे. पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून सुधारणा करुन गुन्ह्यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. नागपूर पोलीस आयुक्तांनी भूमाफियाविरुद्ध कठोर कारवाई केली. त्यांनी यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन केल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. यावर पोलिसांनी कारवाई करत भूमाफियांच्या कब्जात वर्षानुवर्षे असलेली जमीन सामान्य नागरिकांना परत देण्यात आली. यासाठी सर्व स्तरातून नागपूर पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले. नागपूर पोलिसांनी सेफ्टी परसेप्शन इंडिकेशन तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. नागपूर पोलिसांच्या कामात गुणात्मक फरक पडला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी भाग घेतला.
‘भरोसा सेल’ अभिनव उपक्रम
नागपूर पोलीस आयुक्तालयाने राज्यात अभिनव असा ‘भरोसा सेल’ हा उपक्रम चालू केला असून महिलांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई, समुपदेशन आदी उपक्रम राबविले जातात. त्याचे काम कसे चालते, हे आमदार महिलांनाही दाखवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
व्हीसीएवरील कारवाईची चौकशी होणार
सुनील केदार यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पास न दिल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याबाबतचा उपप्रश्नाला उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, विदर्भ क्रिकेट असोसिएशन विरोधात केलेली कारवाई योग्य की अयोग्य या विषयी चौकशी केली जाईल.
गरज पडल्यास पुन्हा एसआयटी
नागपूर पोलिसांनी भूमाफियांसाठी एसआयटी स्थापित केली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक तक्रारी आल्या. त्यांच्या चार्जशिटही दाखल आहेत. एसआयटी ही परमनंट नव्हती. परंतु गरज पडल्यास पुन्हा एसआयटी स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधाकर देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.