- योगेश पांडे, नागपूरसंपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याप्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आता पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाणार असल्याने या घोटाळ्याशी निगडीत असलेल्यांना घाम फुटला आहे. अनेक मोठे अधिकाऱ्यांचे भांडे यात फुटू शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिस ठाण्याकडून तांत्रिक पद्धतीने तपासावर भर देण्यात येत आहे. उपसंचालक उल्हास नरड व वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांच्या चौकशीतून अनेक बाबी समोर आल्या होत्या.
अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते व अनेक वर्षांपासून पगाराची उचल सुरू होती. शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकातून झाली असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासांतून समोर आले.
या प्रकरणाची व्याप्ती शेकडो कोटींमध्ये जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता एसआयटी स्थापन करण्याची मागणी होत होती. राज्य शासनाने तर एसआयटी अद्यापही स्थापन केलेली नाही. मात्र पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.
परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात ही एसआयटी काम करेल. यात सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे, सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, दोन पोलीस उपनिरीक्षक व चार कर्मचारी राहणार आहेत. नऊ जणांची ही एसआयटी बोगस मुख्याध्यापक भरती घोटाळा व शालार्थ आयडी घोटाळा या दोघांचाही सखोल तपास करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.