नागपुरात प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:25 IST2018-09-07T00:25:02+5:302018-09-07T00:25:43+5:30
बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचे माहीत झाल्याने संतप्त झालेल्या एका आॅटोचालकाने भरतसिंग शिवनारायण धाकर (वय २०) या तरुणाची निर्घृण हत्या केली. एमआयडीसीतील राजीवनगरात गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.

नागपुरात प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचे माहीत झाल्याने संतप्त झालेल्या एका आॅटोचालकाने भरतसिंग शिवनारायण धाकर (वय २०) या तरुणाची निर्घृण हत्या केली. एमआयडीसीतील राजीवनगरात गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता. मृत धाकर ग्वाल्हेर येथील मूळ निवासी असून, सहा महिन्यांपूर्वी तो रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात राहायला आला होता. आरोपीचे नाव अमरेंद्र ऊर्फ मोनूसिंग परमेंद्रसिंग (वय २०) आहे तो राजीवनगरातील रहिवासी असून आॅटो चालवितो. धाकर हा नेहमी आरोपी मोनूसिंगच्या घरासमोरून जात येत होता. त्याचे आपल्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने मोनूसिंगने धाकरला दोन तीन वेळा फटकारले होते. दरम्यान, धाकर आपल्या गावाला निघून गेला. दोन तीन दिवसांपूर्वीच तो नागपुरात परत आला. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास तो आरोपी मोनूसिंगच्या घरासमोरून जात होता. ते पाहून आरोपीने त्याला अडवले. तुला वारंवार समजावूनही तू का ऐकत नाही, असे सांगून त्याने धाकरशी वाद घातला. धाकरने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने चिडलेल्या आरोपीने गुप्तीसारख्या तीक्ष्ण शस्त्राचे छातीवर घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी जखमीला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी धाकरला मृत घोषित केले. माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस घटनास्थळी धावले. तत्पूर्वीच आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.