नागपूर मिहानला नवी उंची; ‘एसईझेड’ सुधारणा विधेयकामुळे औद्योगिक घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:34 IST2025-07-15T16:33:08+5:302025-07-15T16:34:05+5:30
मिहानमधील एसईझेडला हायस्पीड सिग्नल : कायदा मंजुरीने आर्थिक क्रांतीची वाट

Nagpur MIHAN reaches new heights; Industrial developments gain momentum due to ‘SEZ’ amendment bill
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे दोन दशक जुने विशेष आर्थिक क्षेत्र (एसइझेड) सुधारणा विधेयक यंदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार आहे. त्यामुळे नागपूरच्या मिहानमधील 'एसइझेड'मध्ये जवळपास १५८२ एकर रिक्त जागेवर मोठ्या कंपन्यांना गुंतवणुकीच्या प्रचंड संधी निर्माण होतील. विधेयकामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना देशांतर्गत मालाची विक्रीची मुभा मिळाल्यानंतर मिहानमध्ये 'बूम' येईल.
कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे देशात 'एसईझेड' मधील उत्पादनांना चालना मिळेल. या विधेयकात 'एसईझेड'मधील कंपन्यांना स्थानिक बाजारपेठेत वस्तू आणि सेवा विकण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे स्थानिक वापर आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. या माध्यमातून नोकरशाहीतील अडथळे कमी करण्याचा आणि एकल-विंडो क्लिअरन्स सिस्टम मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या सुधारणा विधेयकाला अधिक गतिमान आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेशी एकात्मिक बनवण्यासाठी डिझाइन केले आहे, त्यामुळे गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि एकूण आर्थिक वाढ वाढण्याची शक्यता आहे. विधेयकात अनेक सुधारणांचा उल्लेख असल्याने नागपूरच्या 'एसईझेड'मधील असल्याने रिक्त जागांकडे देशभरातील गुंतवणूकदार नक्कीच आकर्षित होतील, अशा उद्योजकांच्या प्रतिक्रिया आहेत. या क्षेत्रातील उत्पादित मालावर स्थानिक कर लागणार नाही, मात्र, 'एसईझेड'मधील कंपन्यांना आयातीत मालावर कर भरावा लागेल, हे विधेयकाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे उद्योजक म्हणाले.
मिहान 'एसईझेड'ची वैशिष्ट्ये :
- नागपूर मिहानमध्ये 'एसईझेड' करिता १२३६ हेक्टर जागा.
- २४ कंपन्यांना ६०३ हेक्टर जागेचे वितरण.
- निर्यातीत नियमांमुळे ६३३ हेक्टर जागा रिक्त.
- एसईझेड परिसरातील मध्यवर्ती सुविधा इमारतीत ३६ कंपन्या.
- २, ३, ४, ६ पदरी रस्ते.
- वीज व पाणी पुरवठा, टेलिकॉम नेटवर्क, सिव्हेज ट्रीटमेंट प्लॅट, सिंगल विंडो क्लिअरन्स.
"'एसईझेड' सुधारणा विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर नागपुरातील मिहानमधील 'एसईझेड'सह देशातील एकूण ३६५ 'एसईझेड'ला सुगीचे दिवस येतील. सर्वच रिक्त जागांवर मोठ्या कंपन्या उभ्या राहतील. या विधेयकामुळे मालाच्या विक्रीवरील बंधने शिथिल होऊन कंपन्या निर्यातीसह देशांतर्गत मालाची विक्री करू शकतील. नागपुरातील 'एसईझेड'मध्ये ६३३ हेक्टर जागा रिक्त आहे. मोठ्या कंपन्यांमुळे रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील."
- मनोहर भोजवानी, अध्यक्ष, मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन.