लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, पण कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. एका समाजातून आरक्षण काढून दुसऱ्याला देणे योग्य होणार नाही. मात्र याबाबत काँग्रेसने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असे मत व्यक्त करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. आरक्षणाबाबत काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली आहे. राहुल गांधी म्हणतात, ओबीसी आरक्षण कायम ठेवा, जातीय जनगणना करा. पण महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते ओबीसी आरक्षण काढून मराठ्यांना देण्याची भाषा करतात. त्यामुळे काँग्रेसने मराठा आरक्षणाबाबत – नक्की भूमिका काय? हे स्पष्ट करावे असेही बावनकुळे म्हणाले.
आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे, मात्र गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणात आंदोलन करणे योग्य नाही. चार दिवसांनी आंदोलन झाले असते तरी हरकत नव्हती असेही बावनकुळे म्हणाले.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणिउपमुख्यमंत्री अजित पवार सरकारही त्याच भूमिकेत आहे की, आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून न देता स्वतंत्र द्यावे, असे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी खूप काम केले. त्यांच्यावर जातीवरून टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हकॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय? नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षण कमी करण्याच्या चळवळीला पाठिंबा दिला का? काँग्रेसने यावर ठराव घेतला का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना ओबीसी समाजाच आरक्षण काढायचे आहे काय? ते दुसऱ्या समाजाला द्यायचा आहे काय? की मराठा समाजाला वेगळ आरक्षण दिले पाहिजे या बाबत कुठली भूमिका आहे हे स्पष्ट केले पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.